माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा..  ठाणे जिल्ह्यासाठी मोठी आशा..!

‘वेव्हज्‌ २०२५’

WAVES 2025

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र आज एका महत्त्वपूर्ण वळणावर उभे आहे. तंत्रज्ञानाचा वेगवान विकास, जागतिकीकरण आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींमुळे या क्षेत्रात नवीन संधी आणि आव्हाने निर्माण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर, देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणून ओळखली जाणारी ‘WAVES 2025’ ही जागतिक परिषद मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणार आहे. केवळ भारतच नव्हे, तर जागतिक स्तरावर माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनाला चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी नवीन क्षितिजे निर्माण करणारा हा एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि येथील प्रतिभावान मनुष्यबळ यांचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.

ठाण्याची भूमिका आणि महत्त्व

मुंबई आणि महाराष्ट्राचे मनोरंजन क्षेत्रातील अनमोल योगदान सर्वश्रुत आहे. बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून या राज्याने नेहमीच देश आणि जगाला उत्कृष्ट मनोरंजनाच्या संधी, आनंद दिला आहे. आता ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून याच मुंबईला आणि पर्यायाने महाराष्ट्राला जागतिक ‘क्रिएटर हब’ म्हणून नवी ओळख मिळविण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न होत आहे. ठाणे जिल्हा जो मुंबई महानगर प्रदेशाचा एक अविभाज्य भाग आहे, या महत्त्वपूर्ण घडामोडींचा एक साक्षीदार आणि संभाव्य लाभार्थी ठरू शकतो.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातही अनेक कलावंत, तंत्रज्ञ आणि उद्योजक कार्यरत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी, नाटक, मालिका आणि नवोदित डिजिटल माध्यमांमध्ये ठाण्यातील व्यक्ती आणि संस्थांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘WAVES 2025’ सारख्या जागतिक परिषदेमुळे ठाण्यातील या प्रतिभा आणि उद्योगांना एक नवीन मंच, संधी मिळू शकते. जागतिक स्तरावरील तज्ज्ञ आणि उद्योजकांशी संवाद साधण्याची, नवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि गुंतवणुकीच्या संधी शोधण्याची संधी ठाण्यातील व्यक्तींना या परिषदेमुळे मिळू शकेल.

ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’कडे महाराष्ट्राची झेप आणि ठाण्याची तयारी

ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या प्रतिष्ठित जागतिक परिषदेच्या धर्तीवर भारतात प्रथमच ‘WAVES 2025’ चे आयोजन होत आहे. जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत, ही बाब भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी गौरवाची आहे. ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’मध्ये महाराष्ट्राला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.

ठाणे जिल्ह्याला या संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील क्षमता जगासमोर आणण्यासाठी योग्य नियोजन आणि प्रभावी रणनीती आखण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवर उत्कृष्ट दर्जाचे निर्मिती केंद्र (Production Hubs) विकसित करणे, कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि जागतिक मानकांनुसार पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

WAVES बाजार’: ठाण्यासाठी संधींचे दालन

‘WAVES 2025’ मध्ये आयोजित ‘WAVES बाजार’ हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि आकर्षक व्यासपीठ आहे. हे एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून, जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नवीन प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना आणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, श्रेणीआधारित शोध प्रणाली (Category-based search system) आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधेमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील.

ठाण्यातील निर्माते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ आणि वितरक यांच्यासाठी ‘WAVES बाजार’ एक मोठी संधी घेऊन येऊ शकते. त्यांना त्यांचे प्रकल्प जागतिक स्तरावरील खरेदीदारांसमोर मांडण्याची, सहकार्यासाठी नवीन भागीदार शोधण्याची आणि आपल्या कामासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी मिळेल. ‘WAVES बाजार’ च्या माध्यमातून ठाण्यातील कला आणि संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे शक्य होईल.

परिषदेतील विविध सत्रे आणि ठाण्यासाठी उपयुक्तता:

‘WAVES 2025’ मध्ये आयोजित होणारी विविध सत्रे ज्ञान आणि अनुभवाचा खजिना असणार आहेत. जागतिक उद्योग नेते, विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील, जे ठाण्यातील उद्योजकांसाठी आणि नवोदितांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

परिषद सत्रे:

जागतिक स्तरावरील तज्ज्ञांचे विचार ऐकणे, त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेणे आणि भविष्यातील ट्रेंड्स समजून घेणे ठाण्यातील व्यावसायिकांसाठी दिशादर्शक ठरू शकते.

मीडिया मार्केटप्लेस:

भारताच्या माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील विविधता आणि क्षमतांचे प्रदर्शन पाहणे आणि त्यातून प्रेरणा घेणे ठाण्यातील निर्मात्यांसाठी महत्त्वाचे आहे. या प्रदर्शनातून नवीन कल्पना आणि तंत्रज्ञान आत्मसात करता येऊ शकते.

तंत्रज्ञान प्रदर्शन:

नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो पाहणे ठाण्यातील तंत्रज्ञांना आणि नवोद्योजकांना नवीन संधींची कल्पना देऊ शकते. व्हर्च्युअल रिॲलिटी (VR), ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम:

भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम पाहणे केवळ मनोरंजकच नाही, तर आपल्या सांस्कृतिक परंपरांना जागतिक स्तरावर कसे सादर करावे, याची शिकवण देतात. ठाण्यातील कलाकारांना या कार्यक्रमांमधून प्रेरणा मिळू शकते.

नव्या कल्पनांना दिशा आणि ठाण्याची जबाबदारी:

माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या एका मोठ्या बदलातून जात आहे. पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वाढता प्रभाव आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी यामुळे नवनवीन कल्पनांना वाव मिळत आहे. ‘WAVES 2025’ ही परिषद याच नव्या कल्पनांना दिशा देऊन, भारताला जागतिक M&E सुपरपॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा योग्य समन्वय साधून, भारताला ‘ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन’ बनवण्याचे स्वप्न या मंचाद्वारे साकार होणार आहे.

ठाणे जिल्ह्याची यात एक महत्त्वाची भूमिका आहे. जिल्ह्यातील कला आणि मनोरंजन क्षेत्रातील क्षमता ओळखून, त्यांना योग्य प्रोत्साहन देणे आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्यात समन्वय साधणे, कौशल्य विकास कार्यक्रमांना चालना देणे आणि नवोद्योजकांना मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती एक सकारात्मक संकेत:

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींची ‘WAVES 2025’ मध्ये उपस्थिती असणे, या परिषदेच्या महत्त्वाला आणि सरकारच्या या क्षेत्राकडे असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाला अधोरेखित करते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योग निश्चितच एक नवीन उंची गाठेल.

ठाणे जिल्ह्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी सक्रियपणे पुढे यायला हवे. जिल्ह्यातील उद्योजक, कलावंत आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करून ‘WAVES 2025’ मध्ये प्रभावीपणे सहभागी होण्याची गरज आहे. आपल्या क्षमतांचे योग्य प्रदर्शन करणे, जागतिक स्तरावरील संबंध प्रस्थापित करणे आणि गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेणे हे ठाण्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

‘WAVES 2025’ केवळ एक परिषद नाही, तर भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक नवीन युगाची सुरुवात आहे. ठाणे जिल्ह्यासाठी ही परिषद अनेक संधी घेवून आली आहे. जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि उद्योगांना जागतिक स्तरावर ओळख मिळवण्याची, नवीन तंत्रज्ञान आणि कल्पना आत्मसात करण्याची आणि आर्थिक विकासाला चालना देण्याची ही उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून, ठाणे जिल्हा देखील ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’मध्ये आपले महत्त्वपूर्ण स्थान निश्चित करू शकतो. यासाठी योग्य नियोजन, सक्रिय सहभाग आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग, ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून ठाण्याच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा देऊया..!

०००

  • मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे