केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांच्या उपस्थितीत सागरी किनारपट्टीच्या मत्स्योत्पादक राज्यांची बैठक संपन्न

मुंबई, दि. 28 : देशातील सागरी मासेमारीच्या संधी, आव्हाने आणि समस्या या विषयावर सागरी किनारपट्टीची 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांची एकत्रिक बैठक हॉटेल ताज पॅलेस येथे झाली. या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व ग्रामविकास मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंह यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे उपस्थित होते.

या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एस.पी.सिंग बाघेल, केद्रीय पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री जॉर्ज कुरियन, कर्नाटकचे मत्स्यव्यवसाय मंत्री मनकाला वैद्य, आंध्रप्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री किनजारापू अत्चान नायडू, गोव्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री निलकांत हालरनकर, गुजरातचे मत्स्यव्यवसाय मंत्री पुरषोत्तमभाई पटेल, केंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव अभिजित लिख्वी, सह सचिव नितू प्रसाद आदींसह 9 राज्य व 4 केंद्रशासित प्रदेशातील मत्स्यव्यवसाय सचिव, आयुक्त, संचालक व अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव श्री लिख्वी यांनी बैठकीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, देश आज जगात मत्स्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसायाचा मोठा सहभाग आहे. तसेच निर्यातीमध्येही मत्स्यव्यवसाय आघाडीवर आहे. देशातील मत्स्योत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे ध्येय असून त्यासाठी आजची ही बैठक महत्त्वाची आहे. यावेळी सह सचिव श्रीमती प्रसाद यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देशाच्या मत्स्यव्यवसायाची माहिती सादर केली.

या उद्घाटनप्रसंगी मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचा, देशातील विविध राज्यातील मत्स्योत्पादक लाभार्थ्यांना, लाभ देण्यात आला. त्यामध्ये टर्टल एक्स्लुडरचे वाटप 5 लाभार्थ्यांना करण्यात आले. वर्सोवा, अंधेरी येथील देवेंद्र गजानन काळे, पनवेल कोळीवाडा येथील किरन पांडुरंग भोईर यांना लाभ देण्यात आला. मासेमारी विमा योजनेचा लाभ 8 लाभार्थ्यांना देण्यात आला. क्लायमेट रेजिलेंट कोस्टल फिशिंग व्हिलेजचे प्रमाणपत्र अर्नाळा, ता. वसई, जि. पालघर या गावास देण्यात आले. तर रणजीत काळे, वर्सोवा, मुंबई, संतोष खंदारे, मेढा, मालवण, कांचन चोपडेकर, मालवण यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. याशिवाय मच्छिमार सहकारी संस्था व मच्छिमार उत्पादक संस्थांचे प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले. तसेच मलाड येथील राफ्टेक सोल्युशनव प्रा.लि. यांना उत्कृष्ट स्टार्टअप प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. एफआयडीएफ अंतर्गत प्रकल्प असलेल्या जिलानी मरिन प्रोडक्ट, रत्नागिरी, या फिश प्रक्रिया उद्योगास, खोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौका तयार करण्यासाठी कुलाबा, मुंबई येथील राजू चौहान यांना आणि श्रीम्प हॅचरीज उभारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मंडन ॲक्वा फिशरीज सहकारी संस्थेस प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध उपक्रमांची सुरुवातही करण्यात आली. त्यामध्ये सागरी मत्स्यगणना, टर्टल एक्स्लुडर योजना, सागरी मत्स्यगणनेसाठी मत्स्यव्यवसाय विभागांना टॅबलेटचे वाटप यांचा समावेश आहे.

00000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ./