थॅलेसेमिया मुक्तीसाठी ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान

थॅलेसेमिया मुक्तीसाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 

मुंबई, दि. २९ : थॅलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृती ही सर्वात महत्वाची आहे. तसेच या आजाराविषयीच्या तपासण्याही होणे गरजेचे असल्याने थॅलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा. तसेच या आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियान’ ८ मे २०२५ पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व थॅलेसेमिया  ग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

थॅलेसेमिया  रुग्णांचा राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ. महेंद्र केंद्रे, अवर सचिव अविनाश जाधव यांच्यासह परभणीचे थॅलेसेमिया  प्रतिसाद केंद्राचे डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदी उपस्थित होते.

थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक अजार असून याविषयी पालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगून राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, यासाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन करावे. या आजाराची कारणे आणि लक्षणे याविषयी लोकांना माहिती द्यावी. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी  आशा सेविकांना प्रशिक्षण द्यावे. राज्यात विविध विभागांचे समन्वयक नेमण्यात आलेले आहेत. त्यांनाही यामध्ये सहभागी करावे. तसेच याविषयी केलेल्या कामाचा नियमित आढावा घेण्यात यावा. गरोदर मातांची सिकलसेलसह थॅलेसेमिया ची तपासणी करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी सीएसआर फंड मिळण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. सध्या अस्तित्वास असलेल्या १०४ या टोल फ्रि कमांकावरही या आजाराविषयीची माहिती  व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, याकरिता संकेतस्थळ तयार करावे, अशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/