मुंबई, दि. 29 : भारतात ‘क्रिएटिव्हिटी’ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर ‘क्रिएटिव्हिटी’ असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हॉटेल ताज एंड, वांद्रे येथे युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबईमधील क्रिएटिव्ह इकॉनॉमी, मुंबईमध्ये होणारी ‘वेव्हज’ समिट, मुंबई ,महाराष्ट्र व देशात यूट्यूबचे फॉलोअर, युट्यूबचा विस्तार, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात होणारा उपयोग यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.
चर्चेदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील दुर्गम भागात शिक्षणासाठी युट्यूब हे चांगले माध्यम होऊ शकते. शैक्षणिक साहित्य विविध क्रिएटिव्हिटी वापरून युट्यूबवर टाकल्यास विद्यार्थी आवडीने पाहत त्याचे आकलन करतात. क्रिएटरच्या माध्यमातूनही असे शैक्षणिक साहित्य युट्यूबवर टाकल्यास त्यांच्या शिकवण्याची पद्धत ही त्यांना आवडून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यांचे विषय समजू शकतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बद्दल युट्यूबमुळे होऊ शकतात. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात युट्युबने शासनास सहकार्य करावे.
मुंबईमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये युट्युबने शासनासोबत काम करावे. संस्थेची रचना, अभ्यासक्रम, तसेच भविष्यातील क्रिएटिव्हिटीचे क्षेत्र निवडून त्यावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शॉर्ट टर्म, लाँग टर्म अभ्यासक्रम संस्थेमार्फत सुरू करण्यात येतील. यामध्ये यूट्यूब महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनण्याची क्षमता मुंबईमध्ये आहे. अशा मुंबई शहरात ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. युट्यूबमुळे अनेक ‘ क्रिएटिव्ह’ लोक आपले कौशल्य जगासमोर आणत आहेत. त्यांच्यातील माहीत नसलेले कला गुण युट्यूबमुळे समोर येत आहेत. अशा व्यक्ती युट्यूब चॅनेल चालवून आपली ‘क्रिएटिव्हिटी’ जगासमोर आणतात. या चॅनलच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्नही त्यांना मिळत असते, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
0000
नीलेश तायडे/विसंअ/