सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर

मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे. त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश दि. 1 मे 2025 पासून राज्यभरात अंमलात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे अनावरण कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते नरीमन भवन, मुंबई येथे करण्यात आले.

सुरक्षा रक्षकांच्या गणेवेशाच्या रंग खाकी असावा, अशी मागणी विविध संघटना व सुरक्षा रक्षकांनी शासनाकडे केली होती. कामगार मंत्री यांनी ही मागणी मान्य केली आहे. राज्यभरात जिल्हानिहाय 16 सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता 1 मे पासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे. या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एकसंघ राहील व त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल. तसेच या नव्या गणवेशामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/