ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

ठाणे, दि. ०१ (जिमाका): ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन त्यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पंजाबराव उगले, संजय जाधव, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मीना मकवाना, पंकज शिरसाट, डॉ. श्रीकांत परोपकारी, शशिकांत बोराटे, सुभाष बुरसे, डॉ.मोहन दहीकर, अमरसिंह जाधव, प्रशांत कदम, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, प्र.उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) सचिन चौधर, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) कार्यकारी अभियंता संजय पुजारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, ममता डिसूझा, तहसिलदार संजय भोसले, उमेश पाटील, रेवण लेंभे, डॉ.आसावरी संसारे, प्रदीप कुडाळ, उज्वला भगत, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, विठ्ठल दळवी, स्मितल यादव, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या निर्मितीला आज 66 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना श्रद्धासुमने वाहण्याचा दिवस आहे. या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडले. बलिदान केले. त्यामागे अनेक दिग्गजांची तपश्चर्या आहे, कर्तृत्त्व आहे. त्या साऱ्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिले त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमोल योगदान आहे. त्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत, आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहेत. ही वेळ छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची आहे. एकमेकांमधले हेवेदावे, पक्षभेद, अंतर्गत वाद-भांडणं गाडून देशासाठी एकजुटीने उभे राहण्याची आहे. राष्ट्रकार्याची वेळ आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने बुधवारी घेतला. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच हे वृत्त येऊन धडकले. मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच देशाला मिळाली, असं म्हणावं लागेल. या निर्णयामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल. या निर्णयामुळे वंचित, शोषित समाज घटकांना न्याय मिळेल. सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल, याची खात्री आहे.

काश्मिरमधले 370 कलम हटवणे असो, माझ्या बहिणींना सत्तेत वाटा देणारे नारी शक्ती वंदन असो, वक्फ बोर्ड सुधारणा कायदा असो. मोदींनी धाडसी निर्णय घेतले.

देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर वन आहे. महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचे मोठे योगदान आहे. पण, मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळे महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येते. ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाली.

ते म्हणाले की, ठाणे हे माझे घर आहे. या जिल्ह्याशी माझा एक ऋणानुबंध आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या. ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे दाखवून दिलं. ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात 80 हजार कोटींपेक्षा अधिकचे प्रकल्प मंजूर केले. त्यामुळं पुढच्या दहा वर्षात ठाणे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा बनणार, यात शंकाच नाही. ठाणे जिल्ह्याचे आपल्या अर्थव्यवस्थेतले योगदान 48 बिलियन डॉलरचे आहे. 2030 पर्यंत ते 150 बिलियन डॉलरइतके करायचं आहे. एमएमआरच्या विकासासाठी एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमओयू झाला आहे. मुंबईचा जीडीपी दुप्पट होणार आहे. मुंबईएवढेच पालघर, ठाणे आणि रायगडचंही योगदान असणार आहे.

पुनर्वसन, परवडणारी घरे, जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा, आणि दर्जेदार लाईफ स्टाईल, असा ठाणे जिल्ह्याचा चौफेर विकास करायचाय. देशातले सगळ्यात मोठे ट्रांसफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न मी पाहिलं आहे. आपलं सरकार ते कोणत्याही परिस्थितीत साकार करणार आहे. ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे तब्बल 34 इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल, फ्लायओव्हर्सचा समावेश आहे, त्यासाठी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे.

माझ्याकडे गृहनिर्माण, नगर विकास यासारखी महत्त्वाची खाती आहेत. आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतोय. येत्या पाच वर्षात आठ लाखापेक्षा जास्त घरं बांधणार आहोत. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचे कामही 96 टक्के पूर्ण झाले आहे. शासन म्हणजे एकटे मंत्री आणि आमदार नसतात तर प्रशासन हे या शासनाच्या रथाचं महत्त्वाचं चाक आहे. मी जिल्हा प्रशासनाचेही कौतुक करतो. ठाणे जिल्हा तर उद्योगांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या दोन वर्षात 10 हजार 61 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 150 सामंजस्य करार केले. त्यातून एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. ठाणे शहराला 32 कि.मी. चा सागरी किनारा असून, 11.90 कि. मी. सागरी किनारा विकासाचे नियोजन केले आहे. त्यातही, 5.30 कि. मी. चा प्रकल्प पूर्ण झाला आहे. 14 हजार क्षमतेचं भव्य असे कन्वेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बंधू भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणेसाठी सीएसआरच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्र उभारले आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे पालिकेचा चौथा क्रमांक आलाय. यंदा यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळणारे सातही विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेच्या कै. सी. डी. देशमुख प्रशासकीय संस्थेचे आहेत. त्यांचे यश आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे.

शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा मध्ये ठाणे पालिकेचा पहिला क्रमांक आला आहे. त्यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उमेद अंतर्गत लखपती दीदी योजनेत ठाणे ठाणे जिल्ह्याने शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. सुमारे 47 हजार स्वयंसहाय्यता गटांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांहून अधिक झाले आहे. मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमात ठाण्याला पारितोषिक मिळालंय. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान मध्ये कुटुंबांना घरकुल देण्यासाठी मिशन मोडवर कामकाज करण्यात आले. स्मार्ट पीएचसी आणि स्मार्ट स्कूल उभारली जात आहेत. मीरा-भाईंदर येथे दिवाणी तर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचेही लोकार्पण नुकतेच संपन्न झाले.

ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हानं सुद्धा मला दिसतात. जिल्ह्यातल्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी काळू धरण कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत. त्यासाठी कविवर्य सुरेश भट यांच्या ओळी मला कायम प्रेरणा देतात.. गे मायभू तुझे मी फेडिन पांग सारे आणीन आरतीला ते सूर्य चंद्र तारे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे शेवटी म्हणाले.

ध्वजवंदनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उघड्या जीपमधून परेड निरीक्षण केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विविध पथकांनी संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच शीघ्र प्रतिसाद रुग्णवाहिकांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धनके यांनी केले.

०००