पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. ०१:  आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधण्यात आलेल्या 2 हजार 120 मीटर लांबीच्या पुलाचे उद्घाटन (टप्पा क्र. 2) च्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माजी महापौर दत्ता धनकवडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या पुलामुळे वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला येथील वेगाने वाढत असलेल्या परिसराचा वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोयेगाव असे पाच चौक ओलांडता येणार असल्यामुळे हवेचे प्रदूषण होणार नाही तसेच वाहतुकीसाठी अर्धा तास कमी होणार आहे. येथून सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करत असतात. हा उड्डाणपूल केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून शहराच्या नवनिर्मितीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर वाढत असल्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुण्याला मुळशी धरणाचे आणि पिंपरी चिंचवडला ठोकरवाडी धरणाचे पाणी मिळावे, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मध्यंतरी विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम केले. ते देखील कमी पडत असल्यामुळे नवीन विमानतळाचे काम हाती घेतले आहे. काही नाराजी असली तरी जमीन घेतल्याशिवाय, पुनर्वसन केल्याशिवाय विकास होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी येरवड्यापासून नवीन बोगदा, ई – वाहने वाढण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन पर रक्कम देण्यासाठी पुढच्या पाच वर्षांसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातूनही शहरातील पर्यावरणाचा विचार केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने सुविधा देणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुला-मुलींकरता रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. टाटा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने 350 कोटी रुपयांचा प्रकल्प बाणेर येथे हाती घेतला आहे. यातून येथील मुला मुलींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे प्रशिक्षण रत्नागिरी तसेच गडचिरोली येथे सुरू केले असून छत्रपती संभाजीनगर, बीड येथे सुरू करण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीर येथे घडलेल्या घटनेची बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून या घटनेच्या पार्श्वभीवर सुरक्षितता बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हडपसर येथून यवतपर्यंत खालून 6 पदरी आणि वरून चार पदरी उन्नत मार्ग करण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच वडगाव शेरी पासून वाघोलीच्यापुढे शिक्रापूरपर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनेही निर्णय घेतला आहे. एक बाह्यवर्तुळ मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमार्फत आणि दुसरा पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा पद्धतीने राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न चालू आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, या पुलासाठी सिंहगड रस्त्यावरील रहिवाशांनी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण या पुलाच्या निर्मितीमुळे कमी होईल. पुण्यातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल ठरला. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा, नागरीकरणाचा विचार करता या पुलाची आवश्यकता होती, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले की, पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी राज्य शासन, केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू झाले आहेत. आज पुण्यामध्ये 32 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची मेट्रो सुरू आहे. आता खडकवासला ते खराडी या नवीन मेट्रो मार्गालाही राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तृत प्रकल्प अहवाल झाले आहेत. पुढील काळामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रोची अंतिम मंजूरी केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मिळवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये ई – बसेस आणि सीएनजी बसेस मिळून जवळपास पंधराशे नवीन बसेस येत आहेत. 2018-19 मध्ये सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आज उद्घाटन झालेल्या या पुलासह, नदीवरील सनसिटी ते कर्वेनगर पूल तसेच नळ स्टॉप चा दुहेरी उड्डाणपूल असे प्रकल्प हाती घेतले, अशी माहिती त्यांनी दिली.

आज पुण्याचा कायापालट होत आहे. लोकसंख्या, नागरीकरण वाढल्यानंतर नागरी प्रश्न वाढतात मात्र ते सोडवण्यासाठी आधीच काळजी घेण्यात येत आहे. आजही देशात राहण्याचे सर्वात सुरक्षित शहर तसेच पहिली पसंती म्हणून पुण्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

पुलाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह अन्य मान्यवरांनी चार चाकी वाहनातून या पुलावरून प्रवास करून पाहणी केली.

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे येताना वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने तीन टप्प्यात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. कामाची निविदा 118 कोटी 37 लाख रुपयांची आहे. त्याअंतर्गत टप्पा 1 मध्ये राजाराम पुलाजवळील स्वारगेट कडे जाणारा 520 मी लांब एकेरी उड्डाणपूल ऑगस्ट 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. टप्पा 2 मध्ये विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर पर्यंतचा सिंहगड कडे जाणारा 2.2 कि. मी. लांब उड्डाणपूल आज खुला करण्यात आला तर टप्पा 3 च्या इंडिअन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौक पर्यंतच्या स्वारगेटकडे जाणाऱ्या 1.5 कि. मी. लांबीच्या उड्डाणपूलाचे काम 15 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

टप्पा 2 च्या पुलाचे काम प्रिस्ट्रेस बॉक्स गर्डर पद्धतीने करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी 7.3 मी असून एकूण पिलर 60 आहेत.

०००