कोल्हापूर, दि. ०१ (जिमाका): कोल्हापूरच्या विकासासाठी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर परिसर विकास आराखडा, सर्किट बेंच, विमानतळ आदी सर्व विषय गतीने मार्गी लावण्यात येत आहेत. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया आणि राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर जिल्हा अग्रभागी राहण्यासाठी सर्वजण सज्ज होऊया, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमारअपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यातून चांगल्या प्रकारे सेवांचे वितरण झाले, असे सांगून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा राज्यस्तरावरून विशेष सन्मानही झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम दिला असून या उपक्रमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना, रखडलेल्या प्रकल्पांना, नवनवीन प्रशासकीय कल्पनांना गती देण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने केलेले काम अग्रभागी आहे. जिल्ह्याने केलेल्या या कामकाजाचे राज्यस्तरावरुनही कौतुक झाले. आता जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देण्यात येत आहे. नुकताच राज्यातील पहिला सहकार दरबार आयोजित करण्यात आला. लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील, सभासदांचा सहभाग वाढेल व विश्वास निर्माण होईल.
श्री क्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा तसेच श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडाही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन, सुशोभिकरण होवून भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढेल.
अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मागासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांसाठी मंजूर सर्व ११८ कोटी रूपये खर्च करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतूनही ५७६ कोटी रूपये खर्च करून सर्वसमावेशक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेने मागील चार वर्षात २० हजार ८२३ लाभार्थ्यांना बँकेमार्फत तब्बल ३३ कोटी १३ लाख कर्ज दिले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लक्षांक ४८० असून ३१ मार्च अखेर ७०८ लाखांची आर्थिक पुर्तता झाली आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत ३१ मार्च अखेर १४९० लाखांची पुर्तता झाली असून उर्वरीत कामे सुरू आहेत.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने विशेष शिबिरे, ग्रामसभा व जनजागृती मोहिमा राबवून आयुष्यमान भारत योजनेतील २५ लाख ५८ हजार ७५५ गोल्डन कार्डचे वितरण करून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. या कार्डधारकांना ६५ खासगी व शासकीय रुग्णालयांमार्फत १२०९ गंभीर व दीर्घकालीन आजारांवर ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०२४-२५ मध्ये ४४८ लाभार्थ्यांना ८ कोटी ७८ लाख इतके अनुदान कृषी विभागाच्या वतीने वितरीत करण्यात आले आहे. पी एम किसान योजनेंतर्गत ६ हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत ६ हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रु. प्रोत्साहनपर निधी प्रदान करण्यात येतो. सन २०२४-२५ अखेर या दोन्ही योजनेअंतर्गत २ हजार ३९९ कोटी अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
आठवड्यातून एक दिवस महिला तपासणीसाठी राखीव “पिंक ओ.पी.डी” सुरू करण्यात आली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक परिणामकारक व उत्तरदायीत्वपूर्ण व्हावी, यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे कामकाज हाती घेतल्यापासून राज्यात २.५ कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरु केली त्यापैकी १ कोटी महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या कर्करोगाविरुद्ध लढ्यासाठी ‘कॅन्सर व्हॅन’ देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
कोल्हापूरमधील 100 वर्ष जुनी चित्रनगरी व त्यातून जिल्ह्यासाठी मिळणारे योगदान फार मोठे आहे. कोल्हापूर हा कमी खर्चात दर्जेदार सिनेमा निर्मितीसाठी पर्याय ठरू शकतो. फक्त सिनेमाच नाही तर कोल्हापूर व परिसरात टीव्ही सिरीयल, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म यांचे नवीन शुटींग करता येते. मुंबईच्या चित्रपटसृष्टीला तोडीस तोड चित्रनगरी असल्यामुळे याच्या विकासासाठीही गतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
आवास योजनांमध्ये कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या सर्व महाआवास अभियानामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यस्तरावर उल्लेखनीय काम केले आहे. जिल्ह्यास केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांचे एकूण ७४ हजार ३६२ लाभार्थींना घरकुल मंजुर करण्यात आली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध केंद्रस्तरीय व राज्यस्तरीय योजनांतर्गत जिल्ह्यामध्ये आज अखेर एकूण ३२ हजार ८१७ युवक-युवतींनी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणचा लाभ घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू मानसिंग पाटील, किरण भोसले, कल्याणी पाटील, पृथ्वीराज पाटील, अभिषेक निपाणी, सृष्टी भोसले व ऐश्वर्या पुरी यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील यादववाडी गावातील सहायक शिक्षक रवींद्र केदार व कळंबे गावातील तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वाजविण्यात आले. तसेच राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पोलीस विभागाच्या बळकटी करण्यासाठी देण्यात आलेल्या 28 वाहनांचे व कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अग्निशमन वाहनाचे वितरण पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
०००