मुंबई, दि. २ : भारतीय संगीत क्षेत्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेला बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विस्तारीत करत असताना स्पॉटीफायसारखी संगीत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी निश्चितच सहाय्यक ठरणार असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित “वेव्हज २०२५ दृकश्राव्य मनोरंजन समिट” मध्ये स्पॉटीफाय ग्लोबलच्या मुख्य सार्वजनिक व्यवहार अधिकारी आणि व्यवसाय अधिकारी डस्टी जेनकिन्स यांच्यासोबत स्पॉटीफाय इंडियाच्या एमडी अमरजित सिंग बत्रा आणि गव्हर्नमेंट अफेयर्स इंडियाच्या संचालक विनीता दीक्षित यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ.अनबळगन पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आणि संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पॉटीफायने संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवला आहे. भारतीय संगीत आणि कलाकारांना विस्तृत व्यावसायिक व्यासपीठाची संधी स्पॉटीफाय सोबत प्राप्त होईल,ही निश्चितच स्वागतार्ह बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
डस्टी जेनकिन्स म्हणाल्या की, स्पॉटिफाय गेली सहा वर्षे भारतात कार्यरत आहे. भारत हा आमच्यासाठी सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे आणि आम्ही येथील समृद्ध संगीत परंपरेशी आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
गेल्या वर्षी स्पॉटिफायने जागतिक स्तरावर संगीत उद्योगाला १० अब्ज अमेरिकी डॉलर वितरित केले. जसे आपण ऑलिंपिकमध्ये खेळाडूंना स्टार्सप्रमाणे गौरवतो, तसेच आम्हाला भारतातील संगीत कलाकारांसाठीही असा आदर आणि ओळख निर्माण करायची आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला विविध माध्यमातून पाठिंबा दिला आहे आणि आम्ही ही भागीदारी भविष्यातही सुरू ठेवू इच्छितो, असे सांगून डस्टी जेनकिन्स म्हणाल्या की, लोकांमध्ये असा समज आहे की टेलर स्विफ्ट स्पॉटिफायवर सर्वात जास्त फॉलो केलेली कलाकार आहे. मात्र, खरे पाहता भारताचा अरिजीत सिंग हा स्पॉटिफायवर सर्वाधिक फॉलो केलेला कलाकार आहे – हे भारतीय संगीताच्या जागतिक प्रभावाचे उदाहरण आहे.
तसेच भारत सरकार कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे. भारतीय संगीताचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा, अशी इच्छा असल्याचे डस्टी जेनकिन्स यांनी यावेळी सांगितले.
००००
वंदना थोरात/विसंअ/