मुंबई, दि. २ : जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत नविन्यपूर्ण संकल्पना, क्रिएटिव्हिटीचा गुणवत्तापूर्ण वापर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्राईम फोकस’ सोबत ३००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी तर प्राईम फोकस च्या वतीने संचालक नमित मल्होत्रा यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या कराराद्वारे ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे २५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुंबतील खार येथे कार्यालय असणाऱ्या, तसेच जगभरात आपल्या शाखा असणाऱ्या प्राईम फोकस कंपनीचे जगभरात काम चालते. या कंपनीसह तिच्या सहयोगी कंपन्यांना आवश्यक त्या परवानग्या / नोंदणी प्रक्रिया / मान्यता / क्लिअरन्स / आर्थिक प्रोत्साहने इत्यादी मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य करण्यात येणार आहे. त्यांना विद्यमान धोरणे, नियम व नियमावलींनुसार आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
०००
संतोष तोडकर/विसंअ/