मुंबई, दि. ४ : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” दि. ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या
अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक दि.५ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी दुपारी ३.०० या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून ‘टेक वारी’ ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या
https://www.youtube.com/@TECH-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80
या यू ट्यूब चॅनलवर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/MahaDGIPR) पाहता येतील.
पहिल्या दिवशी दि. ५ मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती येथे ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर श्री.प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान” या विषयावर केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या श्रीमती देबजानी घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील समिती सभागृह (कक्ष ३), ७ वा मजला येथे”शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसे करावे” या विषयावर मायक्रोसॉफ्ट,नॅसकॉमचे श्री. मंदार कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला “कृत्रिम बुद्धिमत्ता” याविषयी नवी दिल्लीचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग यांचे व्याख्यान होणार आहे.
मंगळवारी दि.६ मे २०२५ सकाळी ११:३० ते १२:३० परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “भाषिणी-भाषेचा अडसर दूर करणे” या विषयावर डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच २:०० ते ३:०० त्रिमुर्ती प्रांगण येथे “प्रवास पाककृतींचा” या विषयावर डिजिटल जगातील महाराष्ट्रीयन पाककृतींची प्रणेती श्रीमती मधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला येथे समिती क्रमांक ३ मध्ये “इंटरनेट ऑफ थींग्ज (Internet of Things)” या विषयावर व्याख्यान होणार आहे.दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी” नेसकॉमचे लौकिक रग्जी यांचे व्याख्यान होणार आहे.
बुधवार दि.७ मे २०२५ तिस-या दिवशी सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘सायबर सुरक्षा: या विषयावर नेस्कॉमचे प्रसाद देवरे आणि सुकृत घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत त्रिमूर्ती प्रांगण मंत्रालय येथे आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांचे ‘आरोग्यदायी जीवनशैली’या विषयावर व्याख्यान होणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत ‘फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे’ या विषयावर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला समिती सभागृह क्रमांक तीन येथे ‘स्मार्ट बैठक आयोजित करणे’या विषयावर झूम नेस्कॉमचे शैलेश रंगारी, मेहेर उल्ली पालेम यांचे व्याख्यान होणार आहे.
गुरुवार दि.८ मे २०२५ – चौथ्या दिवशी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत “शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर” या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय विस्तार येथे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत त्रिमुर्ती प्रांगण येथे”जीवन संगीत” या विषयावर जीवन संगीत समर्थक संतोष बोराडे यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला, समिती कक्ष क्रमांक ३ येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’या विषयावर नेस्कॉमचे मनीष पोतदार,सरस्वती गोल्लेरकरी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० परिषद सभागृह सहावा मजला येथे ‘डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती’या विषयावरती केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशन, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार दि. ९ मे २०२५ पाचव्या दिवशी सकाळी १०:३० ते १:३० समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे वेळेत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांचे “स्टार्टअप डेमो डे” या विषयी व्याख्यान होणार आहे.सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे नॅसकॉमचे श्रीमती प्राजक्ता तळवेलकर, सुची गुप्ता, राहुल मुलाने यांचे “डिजिटली सजग बना” या विषयी व्याख्यान होणार आहे.महाराष्ट्राच्या संत परंपरां आणि भक्तिभावाला उजाळा देणाऱ्या “ज्ञानाची वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमाने ‘टेक वारीचा’ समारोप होणार आहे दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत हा कार्यक्रम त्रिमूर्ती प्रांगण येथे होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेक वारी या कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३.०० वाजता होणार आहे.
‘फूड दॅट हील्स’ या उपक्रमांतर्गत पौष्टिक व पारंपरिक पाककृतींचे दररोज मेनू तयार केले जातील. तसेच विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार आहे.
०००
संध्या गरवारे/विसंअ/