निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

सुधारित युजर इंटरफेस व युजर एक्स्पीरियन्स सोबत ४० हून अधिक आयटी ॲप समाविष्ट करण्यात येणार

मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे. हे नवीन ‘ECINET’ नावाचे एकाच ठिकाणी सेवा देणारे व्यासपीठ आयोगाच्या ४० हून अधिक विद्यमान मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्सचे एकत्रीकरण व पुनर्रचना करणारे ॲप असेल असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ECINET मध्ये आकर्षक युजर इंटरफेस (UI) आणि सोपी युजर एक्सपीरियन्स (UX) असेल, जे सर्व निवडणूक संबंधित सेवांसाठी एकच व्यासपीठ पुरवेल. अनेक अ‍ॅप डाऊनलोड करणे, वेगवेगळे लॉगिन लक्षात ठेवणे यांचा त्रास यामुळे कमी होईल.

हा उपक्रम मार्च २०२५ मध्ये झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून साकार झाला. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित होते.

ECINET वापरकर्त्यांना त्यांचे डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवरून संबंधित निवडणूक माहिती पाहण्याची सुविधा देईल. ही माहिती अधिक अचूक राहण्यासाठी केवळ अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांद्वारेच ती प्रविष्ट केली जाईल. अधिकाऱ्यांकडून माहिती प्रविष्ट केल्यामुळे ती विश्वसनीय राहील. मात्र, कोणताही वाद निर्माण झाल्यास, अधिकृत फॉर्ममध्ये भरलेली प्राथमिक माहिती ग्राह्य धरली जाईल.

ECINET मध्ये मतदार सहाय्य अ‍ॅप, मतदान टक्केवारी अ‍ॅप, CVIGIL, सुविधा २.०, ESMS, सक्षम आणि KYC अ‍ॅप यांचा समावेश असेल, जे मिळून आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहेत. ECINET मुळे जवळपास १०० कोटी मतदार व निवडणूक यंत्रणेतील सुमारे १०.५ लाख बूथ स्तर अधिकारी (BLOs), सुमारे १५ लाख राजकीय पक्षांचे बूथ स्तर प्रतिनिधी (BLAs), ४५ लाख मतदान कर्मचारी, १५,५९७ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), ४,१२३ मतदार नोंदणी अधिकारी (EROs) आणि ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) यांना फायदा होणार आहे.

ECINET ची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे आणि सुलभ वापर, सुरळीत कार्यक्षमता व मजबूत सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर चाचण्या घेतल्या जात आहेत. हे व्यासपीठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ३६ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून, त्यांच्यातील ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी व ४,१२३ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर आणि निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी प्रसिद्ध ७६ प्रकाशनांतील ९,००० पानांची तपासणी करून विकसित करण्यात येत आहे.

ECINET द्वारे पुरवण्यात येणारा डेटा लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० व १९५१, मतदार नोंदणी अधिनियम १९६०, निवडणूक संचालन नियम १९६१ व भारत निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या कायदेशीर चौकटीतच राहील, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

०००