अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’चे उद्घाटन

Oplus_131072

मुंबई, दि. ०५ : प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभागाने आयोजित केलेला ‘टेक वारी’: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ हा उपक्रम राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपण बदलांचा केवळ स्वीकार करत नसून बदलाचे नेतृत्व करत असल्याचा संदेश ‘टेक वारी’ उपक्रमाच्या  माध्यमातून जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

Oplus_131072

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ‘टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर.विमला, प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यासह ज्येष्ठ सनदी अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ५ ते ९ मे दरम्यान टेक वारी अंतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपाल दास यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांनाच होईल. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज्, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन’ ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’, विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ अशा क्षेत्रातील तज्ज्ञ विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे हे विषय सोप्या पद्धतीने समजावून  सांगणार आहेत. काळानुरूप बदल सगळ्यांनी स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

Oplus_131072

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, टेक-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवरील मार्गदर्शन सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडविण्यास मदत होईल.

महाराष्ट्र ‘आय गॉट’वरही प्रथम येईल – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून लोकाभिमुख काम करणारे महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. ‘आय गॉट’ वर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आपले राज्य पहिल्या तीनवरून प्रथम क्रमांक प्राप्त करेल. प्रशासनाने अधिक गतीमान सेवा देण्यावर भर द्यावा. आपल्या प्रत्येकाच्या कामाच्या मूल्यमापनातूनच एकंदरीत कामाचे मोजमाप होत असते महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. प्रत्येक बदलाला सामोराही जात आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील हे बदल स्वीकारून आपले काम अधिक गतीमान पद्धतीने करतील, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केला.

इज ऑफ लिव्हिंगमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे राहील : प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार

प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान अवगत करून अधिकारी व कर्मचारी काम करत आहेतच पण काळानुरूप आपल्या सेवा ‘इज ऑफ लिव्हिंग’ असल्या पाहिजेत. त्या अधिकाधिक लोकामिभुख असाव्यात यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘टेक-वारी’ उपक्रमात मंत्रालय ते गावपातळीवरील अधिकाऱ्यांचा सहभाग – आयुक्त आर.विमला

महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर. विमला म्हणाल्या की, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या प्रयत्नामुळे आणि राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आज केंद्र शासनाच्या ‘ऑय गॉट’ प्रणालीवर सर्वाधिक प्रशिक्षण घेणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिल्या तीन मध्ये आहे. ‘टेक-वारी’ उपक्रम नाविन्यपूर्ण असून त्याचा लाभ नक्कीच सर्व अधिकारी घेतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी ‘टेक वारी’ या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अथक परिश्रम घेवून केले, मात्र त्यांच्या वडिलांचे निधन झाले असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

मंत्रालयात आरोग्य, शिक्षण, कृषी या विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सचे, मन:शक्ती प्रयोगकेंद्रातील उपक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी सूत्रसंचालन केले.

०००

संध्या गरवारे /विसंअ/