कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता- एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक उपक्रम

मुंबई, दि. ०५: तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येते. मात्र एआयचा वापर करताना सावधानता बाळगावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे महासंचालक तथा इंडिया एआय मिशनचे अभिषेक सिंग यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर श्री. सिंग यांनी माहिती दिली. यावेळी वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त आशिष शर्मा, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या निवासी आयुक्त आर. विमला आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या मिशन ‘एआय’संबंधीची माहिती देऊन सिंग यांनी शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा कशा प्रकारे वापर होत आहे याविषयी सविस्तर विवरण केले.

सिंग म्हणाले की, बँकिंग, आरोग्य, शेती, न्यायदान अशा सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. हे तंत्रज्ञान परिवर्तनशील असून सातत्याने त्यात बदल होत आहेत. शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे एकाच माहितीचा विविध योजना, उपक्रमांसाठी वापर करता येतो. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय मनुष्यबळच ‘एआय’वर काम करत आहे. भारतात ‘एआय’ वापरासंबंधीचे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या मनुष्यबळाचा वापर भारतातील शासकीय कामकाजात ‘एआय’च्या वापरासाठी करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. त्यासाठी केंद्र सरकार एआय कोश तयार करत असून राज्याकडून डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे भाषिणी, भारत जेन, इंडिया ‘एआय’ अशी ‘एआय’वर आधारित अँप्लिकेशनही केंद्र शासनाने तयार केली आहेत.

महाराष्ट्रातील विस्तार प्रकल्प हा सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून याद्वारे कृषि क्षेत्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने मिळत आहेत. तसेच अनेक स्टार्टअपही एआयच्या क्षेत्रात काम करत असून महाराष्ट्र त्यामध्ये आघाडीवर असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

अचूक व दर्जेदार डेटा मिळणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामधील आव्हान आहे. अनेकदा कृत्रिम बुद्धिमत्ता ही त्याला पुरविण्यात आलेल्या माहितीवर आधारित उत्तरे देतो. मात्र, ती माहिती अचूक आहे का याचा विचार मानवी बुद्धिमत्तेद्वारेच केला जाऊ शकते. त्यामुळे शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूलचा वापर करताना प्रत्येकाने सावधानता बाळगायला हवी, असेही श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले.

शर्मा यांनी आभार मानले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/