परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मनपा आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना केली.
परभणी जिल्ह्यातील मनपा व नगर पालिका क्षेत्रातील खुल्या जागा व प्रस्तावित कामांचा पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आज आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, नगर परिषद प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त प्रदीप जगताप आदींसह सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, मनपा व नगर पालिका क्षेत्रातील खुल्या जागांचा विकास करणे आवश्यक आहे. नागरिकांसाठी या ठिकाणी बगीचा, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, मियावाकी गार्डन, नाना-नानी पार्क यासारख्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मनपा व नगर पालिका क्षेत्रातील अशा खुल्या जागांची माहिती आपणास आठ दिवसांत सादर करावी. शहराची स्वच्छता यासह घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, एसटीपी प्लान्ट याकडेही लक्ष द्यावे. लोकसहभागातून शहराच्या सौंदर्यीकरणावर भर द्यावा. विशेषत: वृक्षरोपण यासारखे उपक्रम लोकसहभागातून राबवावेत. येत्या जून-जुलै महिन्यात खुल्या जागांवर वृक्ष लागवड करावी. स्वत: अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शहरात फिरुन पाहणी करावी. नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून शहर सुंदर करावे.
यावेळी मनपा आयुक्त व सर्व मुख्याधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे खुल्या जागा व त्यावरील प्रस्तावित कामांची माहिती सादर केली. जेएमएस बायोटेकचे हरिष कुलकर्णी यांनी यावेळी तलावांचे सौंदर्यीकरण याबाबत सादरीकरण केले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या जनजागृतीसाठी मनपाने तयार केलेल्या बोर्डचे विमोचन पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
मालमत्ता कर व नगररचना विभागाच्या अर्जांसाठी १५मे पर्यंत शिबिरे ठेवावी
परभणी शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परभणी महानगरपालिकेच्यावतीने मालमत्ता कर विभाग व नगररचना विभागाशी संबंधित अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने दि. 1 मे ते 7 मे 2025 या कालावधीत प्रभागनिहाय शिबिरे आयोजित केली आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी या शिबीराची मुदत 15 मे पर्यंत वाढवावी, अशी सूचना पालकमंत्री बोर्डीकर यांनी मनपा आयुक्तांना केली.
०००