पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

मुंबई, दि. ६ : सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडत असताना, आता पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासाठीही डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. आपल्या आजी, आईकडून शिकलेले पारंपरिक पदार्थ, मराठी खाद्यसंस्कृती नव्या पिढीला डिजिटल भाषेत सांगणे काळाची गरज आहे, असे मधुरा’ज रेसिपी, चॅनेलच्या प्रमुख मधुरा बाचल यांनी सांगितले.

टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात “प्रवास पाककृतींचा” या विषयावर मधुरा बाचल यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मधुरा बाचल म्हणाल्या, नोकरी किंवा व्यवसायात टिकण्यासाठी तंत्रज्ञानाचे सर्व पैलू आत्मसात करणे आवश्यक आहे. माझ्या यशस्वी प्रवासामध्ये डिजिटल कौशल्यांचा फार मोठा वाटा आहे. मराठी खाद्यसंस्कृती खूप समृद्ध आहे. आजवर मी तीन हजार पेक्षा अधिक रेसिपी पोस्ट केल्या असून, बँकेतील नोकरी सोडून पाककलेच्या प्रवासाला सुरुवात केली. २००९ मध्ये ‘मधुरा रेसिपीज’ या डोमेनची नोंदणी केली आणि कंटेंट रायटिंग, एडिटिंगसारखी कौशल्ये आत्मसात केली. मागील १७ वर्षांपासून हा प्रवास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही व्यवसायात मार्केटिंग महत्त्वाची भूमिका बजावते. आज तंत्रज्ञानाच्या युगात ‘एआय’ टूल्समुळे व्यवसाय आणि नोकरी करणे अधिक सुलभ झाले आहे. मात्र, यशस्वी होण्यासाठी कौशल्य आणि आवड दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. स्वतःचे अस्तित्व निर्माण करून टिकवून ठेवण्यासाठी सातत्य आवश्यक असून, यासाठी ‘प्लॅन बी’ आणि ‘प्लॅन सी’ देखील तयार ठेवावेत. आपल्या कार्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात ‘मधुरा रेसिपीज क्लब’ सुरू केला आहे. सोनी मराठीवर आज काय बनवू या? ५ मेपासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आपली खाद्यसंस्कृती ही केवळ चवीनुसार नसून, ती आरोग्यदायी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक धान्यांमध्ये असलेल्या पोषणमूल्यांचा उल्लेख करत त्यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या अन्नधान्यांचा नियमित आहारात समावेश करण्यावर भर दिला. आपण जे खातो तेच आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब असतं आणि ती चव पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच आपली जबाबदारी आहे. मराठी पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा गोडवा आता केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित न राहता डिजिटल माध्यमांतून जगभर पोहोचू लागला आहे. मराठी पदार्थांच्या रेसिपीज यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या माध्यमांद्वारे रोज शेकडो लोक  बनवण्यास शिकत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/