मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ लौकिक रगजी यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ‘ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ या विषयावर श्री. रगजी यांनी मार्गदर्शन केले.
‘ब्लॉकचेन’ ही संज्ञा मुख्यतः क्रिप्टोकरन्सी (जसे बिटकॉइन) संदर्भात वापरली जाते. ही तंत्रज्ञान प्रणाली माहिती सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने साठवण्यासाठी वापरली जात असल्याचे सांगून श्री. रगजी यांनी ब्लॉकचेनच्या मूलभूत तीन-चार संकल्पना समजावून सांगितल्या. तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
‘प्रूफ ऑफ वर्क’ ही संकल्पना तशी कमी परिचित असली, तरी ती ब्लॉकचेनमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जसे महसूल विभागामध्ये मालमत्ता नोंदवही असते, तसेच ब्लॉकचेनमध्ये व्यवहारांची माहिती साठवली जाते. ही माहिती जर चुकीने भरली गेली, तर ती ओळखणे शक्य होते, कारण प्रत्येक नोंदीची पडताळणी करण्याची यंत्रणा त्यामध्ये असते.
पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून ब्लॉकचेन ही विकेंद्रित प्रणाली आहे, त्यामुळे केवळ एका व्यक्तीकडे नियंत्रण न राहता अनेक नोंदी सार्वजनिक स्वरूपात ठेवता येतात. यामुळे प्रणाली अधिक पारदर्शक बनते. प्रत्येक बदलासाठी ‘प्रूफ ऑफ वर्क’ हे क्लिष्ट गणिती प्रमाणीकरण आवश्यक असल्यामुळे, अनधिकृत बदल करणे जवळजवळ अशक्य होते, असे त्यांनी सांगितले.
श्री. रगजी यांनी सांगितले की, ब्लॉकचेनमध्ये कोण छेडछाड करतो हे शोधणे कठीण असले, तरी याबाबतचे संकेत लगेच समजतात. त्यामुळे ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा व्यवसायिक माहितीच्या सुरक्षिततेसाठी कसा वापर करता येतो, यावर त्यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली.
यावेळी श्री. रगजी यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. स्वागत सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी केले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/