ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री नितेश राणे

सिंधदुर्गनगरी दि. 8 (जिमाका) : आपल्या पाल्यांपासून दुर्लक्षित व हक्कांपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृध्दापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.  ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण तयार केले आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी विरंगुळा केंद्र, समस्या निवारण केंद्र स्थापन करावे तसेच या धोरणात समाविष्ठ बाबींची पुर्तता करुन या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची बैठक आयोजित  करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत, समिती सदस्य भालचंद्र केशव मराठे, दादा कुडतरकर, अरविंद वळंजू, सहायक आयुक्त संतोष चिकणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ श्रीपाद पाटील तसेच संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी समस्या निवारण केंद्र स्थापन करावे, पोलिस स्टेशनच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करावे, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविधयोजना व कायदेशीर तरतुदी यांचा समन्वय साधून ज्येष्ठांना दिलासा देणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.