‘जागतिक वारसा स्थळा’च्या यादीत कातळशिल्पांचा समावेशासाठी रोडमॅप तयार करा – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई, दि. 26 : राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, रत्नागिरी येथील निसर्ग यात्री संस्थेचे पदाधिकारी तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या कातळशिल्पांना स्पॅनिश शिष्टमंडळानी भेट दिल्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला, असे सांगून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, आपल्याकडील कातळशिल्पांची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर याचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. या कातळशिल्पांवर विभागाने आंतररष्ट्रीय दर्जाची डॉक्युमेंटरी तयार करावी. यासाठी या कातळशिल्पांचे फोटोज् तसेच व्हिडिओज् मोठ्या प्रमाणात संकलित करून ठेवावे. या छायाचित्रे आणि व्हिडिओंना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे निर्देशही ॲड.शेलार यांनी दिले.

कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असे सांगून ते म्हणाले की, कातळशिल्पांची व्यापक प्रसिद्धी व्हावी यासाठी समाजमाध्यमांचा वापर करावा. या समाजमाध्यमांवर चांगल्या दर्जाची छायाचित्रे अपलोड करण्यात यावी. डॉक्युमेंट्रीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांची पारदर्शक पद्धतीने निवड करण्याच्या सूचनाही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड शेलार यांनी केल्या.

अपर मुख्य सचिव श्री.खारगे म्हणाले की, राज्यातील कातळशिल्पांचे सर्व्हेक्षण करून त्याची जागा निश्चित करावी, यासासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवावा. संरक्षित कातळशिल्पाचे संवर्धन व्हावे यासाठी योजना तयार कराव्यात. या कातळशिल्पांसंदर्भात जे निगडीत घटक आहेत, त्यांच्या निश्चितीसह जबाबदारी व सहभाग वाढविण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर कातळशिल्पांसंदर्भात जास्तीत जास्त माहिती संग्रहित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

0000

संजय ओरके/विसंअ/