ओव्हल मैदानात फुटबॉल मैदान आरक्षणाबाबत सकारात्मक विचार – क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार

मुंबई, दि. 5 : सर्वसामान्य गरीब, कष्टकरी खेळाडूंकरिता फुटबॉलसह इतर खेळांसाठी ओव्हल मैदान आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

आमदार भाई जगताप यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात ओव्हल मैदानात फुटबॉल खेळासाठी मैदान आरक्षणाकरिता बैठक आयोजित करण्यात आली.

कुलाबा विभागात गरीब कष्टकरी खेळाडूंकरिता मैदान उपलब्ध नाही. कुलाबा विभागातील अनेक तरुण फुटबॉल खेळाडूंनी देशाच्या विविध भागात मोठमोठ्या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. 2017 मध्ये झालेल्या 17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मच्छिमार समाजातील कुमार सौरभ मेहेर या खेळाडूने सर्वोत्कृष्ट खेळाने संपूर्ण जगभर आपली छाप सोडली आहे. त्याचप्रमाणे कुलाबा विभागाने अनेक खेळाडू देशाला दिलेले आहेत. देशाच्या प्रतिष्ठित अशा संतोष ट्रॉफीकरिता महाराष्ट्राच्या संघात प्रतिवर्षी 4 ते 5 खेळाडू हे कुलाबा विभागातील असतात. परंतु ह्या सर्वच खेळाडूंना सरावाकरिता कोणतेही मैदान नसल्याची खंत खेळाडूंनी व्यक्त केली आहे. या प्रतिभावान खेळाडूंना सरावाकरिता चांगले मैदान उपलब्ध झाल्यास सराव करुन चांगले प्रदर्शन करता येऊ शकेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.