मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी आमदार रविंद्र वायकर, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, सहसचिव माणिक गुट्टे, ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पहिनकर, महाराष्ट्र दुग्ध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम आदी उपस्थित होते.
दुग्धविकास मंत्री श्री. केदार म्हणाले, दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागांतर्गत असलेल्या प्रयोगशाळा व अन्न औषध प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळा यांच्यामार्फत दुधातील भेसळ तपासून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भेसळ तपासणी व जनजागृती करणाऱ्या व्हॅन राज्यात कार्यारत असल्याचे सांगून पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरे दूध वितरकांचे दूध विक्री कमिशन वाढ व वाहतूकदराचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही असा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आरे दूध केंद्र भुईभाडेविषयी मुंबई महानगरपालिकेला विरतकांच्या मागणीनुसार प्रस्ताव देण्यात येऊन हा विषय मार्गी लावला जाईल. तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असेही श्री. केदार यावेळी म्हणाले.
000
राजू धोत्रे/वि.सं.अ./003/2020