पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षेतेखालील बैठकीत निर्णय
सोलापूर, दि.4: सोलापूर शहरातील कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आदी उपस्थित होते.
सोलापूर शहरातील कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी चाचण्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. चाचण्यांची संख्या वाढवल्यावर कोरोनाची बाधा झालेल्या नागरिकांना ओळखण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे सध्या केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या तिप्पट चाचण्या करा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या, या चाचण्या करण्यासाठी महानगरपालिकेला आवश्यक मनुष्यबळ, निधी आणि पोलीस बळ दिले जाईल, असे पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले. या चाचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किटस् येत्या तीन-चार दिवसात महानगरपालिकेला उपलब्ध होणार असल्याचे डॉ.मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले. या चाचण्या सुरु करण्यापुर्वी महानगरपालिकेच्या क्वारंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यांची क्षमता वाढवा, अशा सूचना श्री. भरणे यांनी दिल्या.
एखाद्या गावात कोरोनाबाधित नागरिक सापडल्यास संपूर्ण गावातील हालचाली कशा कमी होतील याबाबत कार्यवाही करा, अशा सूचनाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
या बैठकीत श्री.सुधाकर शिंदे यांनी आरोग्य आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. महापालिकेच्यावतीने कॉल सेंटर स्थापन करा, या कॉल सेंटरच्या माध्यमातून को-मॉर्बिड नागरिकांवर लक्ष ठेवा, त्यांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत एसएमएस करा, यामध्ये महानगरपालिकेच्या शिक्षकांना सहभागी करुन घ्या. या मोहिमेत स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सहभागी करुन घ्या, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, डॉ.वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, महापालिकेच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी, डॉ.एच.प्रसाद, पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ.राजेश चौगुले, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, अजयसिंह पवार, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी अधिकारी उपस्थित होते.
सर्व संबंधितांशी चर्चा करुनच लॉकडाऊनबाबत निर्णय
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून संचारबंदी लागू केली जावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी पूर्ण चर्चा करुनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संचारबंदीबाबत शहरातील नागरिकांना पुरेशी माहिती अगोदर दिली जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना प्रसार रोखण्याबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी शहरातील काही कंटेनमेंट झोनला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे यांनी सांगितले, सोलापूर शहरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरु आहेत. राज्य शासनाने तीन तज्ज्ञ डॉक्टरांची समिती पाठवली आहे. या डॉक्टरांशी नागरिकांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता संचारबंदी लागू करावी, असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे नागरिक, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली जाईल. लॉकडाऊन ज्या दिवसापासून लागू केला जाणार आहे त्याच्या अगोदर किमान चार ते पाच दिवस जाहीर केला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणा सज्ज केल्या जातील आणि मगच लागू केले जाईल.