खरीप २०२५ साठी सुधारित पीक विमा योजना

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणा-या नुकसानीपासून शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण  देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना  राबविण्यात येत आहे. या योजनेची ठळक वैशिष्टे

  • खरीप हंगाम विमा योजनेत  भाग घेता येणारी पिके  

भात (धान), खरीप ज्वारी , बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ,  कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील  शेतकऱ्यांना भाग घेता येईल.

  • महत्वाच्या बाबी
    • योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत दि. ३१ जुलै २०२५
    • या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा agristack नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे.
    • अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.
    • कर्जदार आणि  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे .
    • ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पिक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल.
    • विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास  रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालक यांना देऊ नये.
    • एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही .
    • मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार सलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टल वरून जमा करण्यात येणार आहे .
    • सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के आहे.
  • उंबरठा उत्पादन :- अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.
  • विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत

पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत  विविध नैसर्गिक घटक, कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे पिक कापणी प्रयोग द्वारे येणारे  सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळ साठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळ मधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सम प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे .

  • योजना राबविणारी विमा कंपनी व संबंधित जिल्हे
अ.क्र विमा कंपनीचे नाव जिल्हे
भारतीय कृषी विमा कंपनी अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा , वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार , परभणी, वर्धा, नागपुर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , हिंगोली,अकोला, धुळे, पुणे, जालना , गोंदिया, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर , भंडारा, पालघर, रायगड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
2 आयसीआयसीआय लोंबार्ड  जनरल इन्शुरेंस कंपनी लातूर , धाराशिव , बीड

 

  • पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकरी साठीचा विमा हप्ता रक्कम रु./हे .

यात  जिल्हानिहाय  फरक  असतो .

अ.क्र. पिक विमा संरक्षित रक्कम रु./हे. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु/हे
1 भात 49,000  ते ६१,००० 122.50 ते १२२०
2 नाचणी 15,000  ते ४०,००० 37.50  ते १००
3 उडीद 22,000 ते २६,६०० 55.00  ते ५००
4 ज्वारी 25,500 ते ३३,००० 63.75 ते ६६०
5 बाजरी 26,000 ते ३२,००० 75.00  ते ६४०
6 भुईमूग 38,098 ते ४५,००० 95.25  ते ९००
7 सोयाबीन 30,000  ते ५८,००० 75.00 ते ११६०
8 कारळे 20,000 50
9 मूग 22,000 ते २८,००० 55 ते ५६०
10 कापूस 35,000  ते ६०,००० 87.50  ते १८००
11 मका 36,000 90 ते ७२०
१२ कांदा 68000 170 ते ३४००
१३ तीळ 27000 67.50
१४ तूर 37,218 ते ४७,००० 93.75 ते ९४०

 

  • विमा नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाणार

खरीप २०२५ च्या  हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना  महसूल मंडल/तालुक्यात पिक कापणी प्रयोगाद्वारे  आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यांस खालील सुत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. सरासरी उत्पादन काढताना  कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत  रीमोट सेन्सिंग तंत्रज्ञान द्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के आणि पीक कापणी द्वारे प्राप्त उत्पादनास ५० टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे . उर्वरित पिकांचे बाबतीत पिक कापणी द्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे .

उंबरठा उत्पादन – प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पादन

नुकसान भरपाई रु.  = ——————      —————–  -X      विमा संरक्षित रक्कम रू.

उंबरठा उत्पादन

 

  • विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे ?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला agristack नोंदणी क्रमांक, ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड  व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र  घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरुन सहभाग घ्यावा. या शिवाय कॉमन सर्विस सेंटर (CSC) आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता  किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. भाग घेतलेल्या शेतकऱ्याने नंतर ई-पीक पाहणी नोंद पूर्ण करावी.

  • योजनेच्या अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा.

पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७ वर संपर्क करा. संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

विनयकुमार शांता जयसिंगराव आवटे

कृषी संचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन, म.रा., कृषी आयुक्तालय, पुणे -1  

     

                                  0000