एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विधान परिषद प्रश्नोत्तरे

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू आहे. या योजनेत गुरुकृपा हॉस्पिटल अथवा अन्य कोणत्याही विशिष्ट हॉस्पिटल अथवा संस्थेमार्फत वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी सक्ती करण्यात आलेली नाही. कुणी असा दबाव आणत असल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल आणि त्यात कुणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या अनुषंगाने प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, राज्यात ९० हजार हजार एसटी कर्मचारी असून त्यांच्या पगारासाठी वेगळी वेतनश्रेणी आहे. त्यांच्यासाठी महामंडळाने धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना जाहीर केली आहे. या माध्यमातून ४० वर्षावरील कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा आणि ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा आरोग्याच्या ११ तपासण्या करण्यासाठी तीन हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या चाचण्या ठराविक ठिकाणीच करण्यात याव्यात अशी सक्ती करण्यात आली नसून या योजनेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000

बी.सी.झंवर/वि.सं.अ/