अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

  • बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य
  • नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
  • पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय
  • महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय 

नागपूर, दि 9 : अतिवृष्टीमूळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असून सद्या पुरपरिस्थिती नियंत्रणात आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्यामूळे येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल सज्ज ठेवण्यात आले आहे. अतिवृष्टी व पुरामूळे बाधित झालेल्या कुटुंबांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील अतिवृष्टी व पुरबाधित जिल्ह्यांचा आढावा श्रीमती बिदरी यांनी घेतला त्याप्रसंगी जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्यात.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. गवळी, महसूल अपर आयुक्त राजेश खवले तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्तालयाचे प्रतिनिधी, जलसंपदा आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुरपरिस्थितीमुळे बहुतांश गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंध झाली तसेच ज्या गावांचा संपर्क तुटला अशा ठिकाणी प्राधान्याने पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना करतांना विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात यावे व त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्याला प्राधान्य देण्यात यावेत. गोसेखुर्दसह विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करतांना संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला पुर्व सूचना देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे विभागात सात व्यक्ती मृत झाले असून यामध्ये नागपूर व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक, गोंदिया जिल्ह्यात तीन तर गडचिरोली जिल्ह्यात दोघांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे विभागात 1 हजार 190 घरांचे अशंत: तर 117 घरांचे पुर्णत: नुकसान झाले आहेत. 117 जणावरांच्या गोठांचेही नुकसान झाले आहेत.

अतिवृष्टी व पुरामुळे सुरक्षीतस्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 138, नागपूर शहरातील 59 घरांमध्ये पाणी शिरले असून 57 लोकांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले. भंडारा जिल्ह्यात 306 कुटुंबांना, गडचिरोली जिल्ह्यात 156 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पुरामुळे वर्धा जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे नुकसान झाले असून 11 ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर जिल्ह्यात 23 ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात 80 रस्ते बाधित झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात 21 रस्ते बंद आहे तर गोंदिया जिल्ह्यातील 9 रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे ज्याठिकाणी वाहतूक बंद आहे अशा ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवूण बॅरेकेट सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी केल्या.

सिंचन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 दरवाजे उघडण्यात आले असून 5.29 लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारा शहरालगत पुर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून सर्व गेट बंद ठेवून पंप कार्यान्वित करण्यात आले त्यामूळे पुरपरिस्थिती निर्माण झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी वडसा येथे धोकापातळीचे एक फुट वर वाहत आहे. नदीकाठच्या गावांना पुरपरिस्थितीबाबत सूचना देण्यात आल्या आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे दोन गेट उघडण्यात आले त्यातून 9 हजार क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

विभागात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच गडचिरोली  व नागपूर येथे दोन हेलीकॉप्टर, भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती विभागील आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी दिली.

0000