मुंबई, दि. 11 : पनवेल महापालिकेच्या आसूड गाव परिसरातील झोपडपट्ट्या निष्कासित केलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत प्रभावित नागरिकांना जीवनावश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.
पनवेल महापालिकेच्या आसूड गाव परिसरातील झोपडपट्ट्या हटवल्यानंतर बेघर झालेल्या नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले.
राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचे प्रतिनिधी श्री. राकेश मोहिते, डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते, राजकुमार दिनेश नट तसेच आसूड गावातील अनेक झोपडपट्टीधारक यावेळी उपस्थित होते. राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/