देयके अदा केल्याने १०२ क्रमांक रुग्णवाहिकांची सेवा सुरळीत – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १४ : राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, अमोल मिटकरी, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. जानेवारी २०२५ या महिन्यातील केंद्र सरकारचा निधी उशिरा उपलब्ध झाल्याने काही काळासाठी देयके आणि वेतनाची रक्कम प्रलंबित राहिली होती. तथापि केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला असून सर्व देयके आणि वेतन अदा करण्यात आले असल्याने ही सेवा सुरळीत सुरू आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येतील तसेच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य शासनाच्या निधीतून ही गरज भागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महिलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ९ ते १४ वयोगटातील महिलांसाठी उपाययोजना करण्याची केंद्र आणि राज्य शासनाची योजना आहे. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप यासाठी मान्यता दिलेली नसल्याने त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १४ : राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर आणि नियमाप्रमाणे झाले पाहिजे. एखादी कंपनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अथवा नियमाप्रमाणे देत नसल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य उमा खापरे, सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, केंद्र सरकारकडून जानेवारी २०२५ पासून निधी प्राप्त न झाल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित राहिले होते. सध्या हा निधी प्राप्त झाला असून मे २०२५ अखेर पर्यंतच्या मानधनासाठीचा निधी जून महिन्यात वितरित केलेला आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी याबाबतच्या एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी व कार्यवाहीचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तत्कालीन कंत्राटदार नोंदणी नियमानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंता करिता ‘वर्ग-६ चे’ नोंदणी प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. सचिन होले यांनी ‘वर्ग-५ स्थापत्य अभियंता’ नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, चंद्रपूर कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली. तथापि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय, वर्धा या कार्यालयाकडून सदर प्रमाणपत्रावर ‘वर्ग-५ स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता’ असे अनावधानाने टंकलिखित झाले आहे. सचिन होले यांना सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तसेच या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना चंद्रपूर क्षेत्रात कुठलेही कंत्राट देण्यात आलेले नाही, असे पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
या प्रकरणी सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिले.
सचिन होले यांना दिलेले प्रमाणपत्र आणि त्यांना दिलेली कामे याबाबत सदस्य दादाराव केचे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
‘जल जीवन मिशन’मुळे मराठवाड्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. १४ : मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजना पूर्ण झाल्यानंतर पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य हेमंत पाटील यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यात प्रत्येक शहरासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, नल से जल’ ही पाणी पुरवठ्याची योजना राबविण्यात येत आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या शहरांसाठी सुद्धा या योजनांची कामे सुरू आहेत. मराठवाड्याच्या पाणी समस्येवर उपाययोजना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम देखील हाती घेतले आहे. या योजनांच्या पूर्ततेनंतर पाण्याची समस्या दूर होईल, अशी माहितीही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/