‘भटके विमुक्त दिवस’ ३१ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. ३१ : राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

मंत्री श्री. सावे म्हणाले, राज्य शासनाचा हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे. या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.

या दिवशी भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी, आधारकार्ड नोंदणी, जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक दस्तऐवजांची माहिती देणाऱ्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात व अंमलबजावणीची कार्यवाही सुनिश्चित करावी. ३१ ऑगस्ट रोजी सार्वजनिक, साप्ताहिक किंवा स्थानिक सुट्टी असली तरीही ‘भटके विमुक्त दिवस’ याच दिवशी साजरा करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ