- देशातील सर्वोत्कृष्ट महसूल विभाग म्हणून ओळख निर्माण करा
- येत्या तीन महिन्यात झिरो पेन्डंसी उपक्रम राबवा
- निवासी उपजिल्हाधिकारी पद अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार
- तुकडेबंदी कायद्यातील बदलामूळे दीड लाख नागरिकांना लाभ
नागपूर, दि ०१: शासनाच्या विविध उपयोजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रामुख्याने महसूल विभागाची आहे. त्यामुळे प्रशासनाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प आहे. लोकाभिमूख प्रशासन ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
नियोजन भवन येथे महसूल दिन व सप्ताहाचे उद्घाटन तसेच विविध उपक्रम व योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार परिणय फुके, चरणसिंग ठाकूर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महसूल अपर आयुक्त राजेश खवले, अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खाडे तसेच महसूल विभागातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
महसूल विभाग प्रशासनाचा चेहरा असल्याचे सांगत मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रत्येक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या विभागाची आहे. त्यादृष्टीने विभागाच्या कार्यपद्धतीमुळे काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. राज्यात पारदर्शी प्रशासनाची सुरवात मंत्रालयापासून-गावापर्यंत सुरू झाली आहे. हीच भूमिका विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. महसूल विभागाचे सर्व प्रशासकीय प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिल्यामुळे 68 अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवड श्रेणी देवून त्यांना त्यांच्या पुढील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्त्वाचे असून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्न आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पद निर्माण करण्यात येणार आहे. विभागातील प्रतिनियुक्तिवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवांसाठी तीन वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. कालबाह्य असलेले कायदे बदलून त्याऐवजी जनतेला सुलभ सेवा मिळाव्यात यासाठी कायद्याची अंमलबजावणी सुरवात झाली आहे. तुकडेबंदी नियमामध्ये बदल केल्यामूळे दीड लाख नागरिकांना लाभ मिळाला आहे. त्यासोबतच जनतेला आपल्या मालमत्तेसंदर्भात स्वामित्व मिळावे यादृष्टीने बदल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना ते पुढे म्हणाले की, मंत्रालयस्तरावर महसूलासंदर्भात प्रलंबित असलेल्या 13 हजार प्रकरणे निकाली काढण्याचा संकल्प असून त्याप्रमाणेच नायब तहसिलदार ते जिल्हाधिकारीस्तरापर्यंत प्रलंबित असलेली महसूली प्रकरणे येत्या तीन महिन्यात निकाली काढण्याचा संकल्प करण्याच्या सूचना केल्या आहेत. महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावांना भेटी देवून जनेतचे प्रश्न सोडवावेत, नाविन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कामासंदर्भातील माहिती समाजमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहचवावीत यामुळे विभागाबद्दल जनतेमध्ये सकारात्मक्ता निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी महसूल सप्ताहानिमीत्त विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून प्रत्येक उपक्रमामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महसूल दिन व सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कारासोबत ग्रामीण भागात अडीच हजार लाभार्थ्यांनी पट्टे वाटप पांदण रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी महसूल विभागातील कर्मचारी व अधिकारी एक दिवसाचा पगार देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राचा पोर्टलचे अनावरण, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, डिजिटल गाव नकाशा पोर्टलचे लोकार्पण. प्रधानमंत्री आवास योजना, जात प्रमाणपत्र वितरण, मालकीहक्काचे पट्टे वाटप, रेशन कार्ड वितरण, भूमिअभिलेख विभागातर्फे सनद वाटप आदींच्या समावेश आहे.
उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यामध्ये अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपजिल्हाधिकारी वंदना सवरंग पते, विशालकुमार मेश्राम, तहसिलदार जितेंद्र शिकतोडे, दत्तत्रय निंबाळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, नगर भू-मापन अधिकारी प्रशांत हंडे, उपअधिक्षक श्याम पेंदे, नायाब तहसिलदार प्रतिभा लोखंडे, सचिन शिंदे, नितिन गोहणे, सहायक महसूल अधिकारी निजाम शेख, मंडळ अधिकारी पंकज तांबे, महसूल सहायक अमरदिप शिरसाट, तलाठी पवन राणे, स्वियसहाय संजय गिरी, शिपाई रामेश्वर पुरी, सोनु भुरे, वाहनचालक समीर दांडेकर, कोतवाल अनिल उरकुडे, पोलीस पाटील बाळकृष्ण चौधरी, निवृत्त नायाब तहसिलदार अरूण भुरे, अर्चणा तितरमारे यांचा समावेश आहे.
100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
०००