अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक – मंत्री आदिती तटकरे

महसूल दिन गुणगौरव सोहळा

रायगड दि. ०१ (जिमाका): महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.  जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन हॉल येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री तटकरे म्हणाल्या की, महसूल विभाग हा शासनचा कणा असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका कणखरपणे मांडून लोकाभिमुख काम करुन लोकांच्या जवळ जाणे अत्यंत महत्वाचे आहे. शासनाचे नवनवीन उपक्रम येत असून हे उपक्रम योग्यरितीने राबविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. महसूल विभाग जनसामान्यांशी संबंधित विभाग आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा गौरव करणे यासाठी महसूल दिन साजरा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत ते त्यांना देणे व काही अडी अडचणी सोडविल्या जातील असेही त्या यावेळी म्हणाल्या.  शासनाने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान असे अनेक उपक्रम राबविले आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान राबविले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणा जिल्ह्यात सक्षम झाली पाहिजे याकरिता प्रत्येक कार्यालयात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली पाहिले, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

मंत्री भरत गोगावले म्हणाले की, शासन हे गोरगरीब जनतेचे आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला ज्या बाबी आवश्यक आहे ते देणे आपले कर्तव्य आहे ही भावना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनाशी ठेवून काम केले पाहिजे. याकरिता सर्वांनी लोकांच्या हितासाठी काम करावे, अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. महसूल विभागाने हाती घेतलेली कामे अशीच पुढे सुरु ठेवावीत.  नागरिकांना आवश्यक असलेले दाखले, इतर दाखले देण्याचे काम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेत करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, महसूल विभागामार्फत दि. 1 ऑगस्ट पासून ते दि.7 ऑगस्ट पर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.  या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबरोबरच  विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत.  महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने यावर्षी महसूल दिनाबरोबरच दि.1 ऑगस्ट पासून ते दि.7 ऑगस्टपर्यंत या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

या महसूल पंधरवडानिमित्त जिल्ह्यात या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 2 ऑगस्ट: अतिक्रमण नियमानुकूल करणार 31 डिसेंबर 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत.  दि.3 ऑगस्ट: शेत रस्त्यांचे वाद मिटवणार ‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण होईल, आणि झाडे तोडल्यास वनविभागाच्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. दि.4 ऑगस्ट: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप होईल. वर्षातून चार वेळा अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. दि.5 ऑगस्ट: डिबिटी अडचणी दूर करणार, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डिबिटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तलाठी घरोघरी भेटी देतील आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दि.6 ऑगस्ट: शर्तभंग जमिनी परत घेणार-शासकीय जमिनींच्या शर्तभंग प्रकरणांचे सर्वेक्षण होऊन अतिक्रमण किंवा शर्तभंग आढळल्यास त्या जमिनी शासनाकडे परत घेतल्या जाणार आहेत. दि.7 ऑगस्ट: एम सँड धोरण आणि सांगता समारंभ होणार आहे.

यावेळी स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची सनद वाटप, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड, उत्कृष्ट कर्मचारी, महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

आभार अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महसूल विभागातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळअधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.