यवतमाळ, दि.२ (जिमाका): आदिवासी समाजातील घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यंदापासून क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र विशेष पॅकेज जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी दिली.
कळंब तालुक्यातील दत्तापूर (निरंजन माहूर) येथे आदिवासी विकास विभाग व क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना मर्यादित यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनजाती गौरव वर्षाच्या निमित्ताने विदर्भ रॅाबिनहूड शामादादा कोलाम यांची २६ वी पुण्यतिथी व लाभार्थी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला पालकमंत्री संजय राठोड, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मानकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए.पी. काळे, सहायक आयुक्त डॉ. पी.ए. नागापुरे, तहसिलदार अमित भुईटे, गटविकास अधिकारी, ठाणेदार व कोलाम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री प्रा. वुईके म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प पूर्ण करण्याचे कार्य सुरु आहे. हे कार्य युद्धपातळीवर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शामादादा कोलाम यांची जयंती शासनस्तरावर साजरी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आदिवासी समाजाची संस्कृती आणि इतिहास जतन करण्यासाठीही प्रयत्न करित असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, आदिवासी महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी आदिवासी महिला सबलीकरण योजना राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
दत्तपूरला १ कोटी रुपयांच्या सामाजिक सभागृहाला मंजुरी
कळंब तालुक्तील दत्तपूर (निरंजन माहूर) येथे सामाजिक कार्यक्रमांसाठी १ कोटी रुपयांच्या सामाजिक सभागृह मंजूर केल्याची घोषणा मंत्री प्रा. वुईके यांनी यावेळी केली. याबाबत प्रस्ताव प्रकल्प अधिकारी आणि ग्रामपंचायतीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री राठोड म्हणाले की, आदिवासी समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्याची गरज असून राज्य शासन प्रयत्नशील आहे. नव्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे. समाजातील ज्येष्ठ, तरुणांनी समाजाची दिशा ठरविण्याची गरज आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शामादादा कोलाम यांचे योगदान विसरु शकणार नाही. त्यांनी त्यांचे आयुष्य सर्वसामान्यासाठी अर्पण करुन कोलाम समाजाच्या विकासासाठी लढा दिला. भगवान बिरसा मुंडा आणि शामादादा कोलाम यांचे संघर्ष व कार्य डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी. समाजाच्या विकासासाठी व्यापक दृष्टीकोणैतून एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.
या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या विविध घटकातील उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींचा, उत्कृष्ट कर्मचारी व कलावंतांचा सत्कार पालकमंत्री राठोड आणि मंत्री प्रा. वुईके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून करण्यात आला. यासह आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
०००