मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत

मुंबई, दि. ०४: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. नाशिक विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत मागील सात महिन्यांत 3,542 रुग्णांना 32 कोटी 32 लाख 5 हजार रुपयांची भरीव वैद्यकीय मदत केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात पेपरलेस व डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हा कक्षांची स्थापना केल्यामुळे रुग्णांना मंत्रालयात धाव घेण्याची गरज उरलेली नाही. 20 गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते, त्यात कॉक्लियर इम्प्लांट (वय 2–6 वर्षे), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात, मेंदूचे आजार, हृदयरोग, बालकांची शस्त्रक्रिया, नवजात शिशुंचे आजार त्यासोबतच भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त आदी रूग्णांच्या उपचाराकरिता मदत केली जाते.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, रेशन कार्ड, जिओ-टॅग फोटो (रुग्ण दाखल असल्यास अनिवार्य), उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1.60 लाखांपेक्षा कमी असावे), वैद्यकीय अहवाल व खर्चाचे प्रमाणपत्र, संबंधित रुग्णालयाची संगणक प्रणालीवरील नोंद त्यासोबतच अपघातप्रकरणी पोलीस डायरी नोंद आणि अवयव प्रत्यारोपण प्रसंगी झेडटीसीसी  नोंदणी पावती असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in  या ई-मेल वर पाठवावीत. अधिक माहिती करिता टोल-फ्री क्रमांक: 1800 123 2211 वर संपर्क साधावा.

नाशिक विभागातील मदतीचा आढावा (1 जानेवारी ते 31 जुलै 2025)

जिल्हा रुग्णसंख्या मंजूर मदत रक्कम
नाशिक 1,039 10 कोटी 35 लाख  24 हजार
जळगाव 795 6 कोटी 99 लाख 45 हजार
धुळे 95 80 लाख 31 हजार
नंदुरबार 38 39 लाख 55 हजार
अहिल्यानगर 1,575 13 कोटी 77 लाख 50 हजार

 

पेपरलेस प्रणाली, डिजिटल तंत्रज्ञान आणि जिल्हास्तरीय कक्षांमुळे गरजू रुग्णांना सहज मदत पोहोचवणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्षामुळे रूग्ण व नातेवाईकांच्या अनेक समस्या सहज सोडविणे शक्य होत असल्याने आता त्यांना अर्ज करण्यासोबतच वैद्यकिय आर्थिक मदत मिळवणे सोपे बनले आहे. – रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुखमुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष

०००