मुंबई, दि. ०४: भारत निवडणूक आयोगाने १ ते ४ ऑगस्ट या काळातील बिहार येथे झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR 2025) उपक्रम अंतर्गत मिळालेल्या दावे-हरकतींचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
राजकीय पक्षांकडून मसुदा मतदार यादीबाबत आलेल्या दावे-हरकतींत एकूण १,६०,८१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपकडून ५३,३३८, काँग्रेसकडून १७,५४९, बसपाकडून ७४, आम आदमी पक्षाकडून १, सीपीआय (एम) कडून ८९९ आणि नॅशनल पीपल्स पार्टीकडून ७ अर्ज आले.
राज्यस्तरीय पक्षांमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) कडून सर्वाधिक ४७,५०६ अर्ज, जनता दल (यू) कडून ३६,५५०, सीपीआय (एम-एल) (लिबरेशन) कडून १,४९६, लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) कडून १,२१०, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाकडून १,९१३ आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाकडून २७० अर्ज नोंदवले गेले.
याशिवाय, मतदारांकडून थेट सादर झालेल्या दावे-हरकतींची संख्या १,९२७ आहे, तर १८ वर्षे पूर्ण केलेल्या नव्या मतदारांकडून (फॉर्म ६ आणि घोषणा) १०,९७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. नियमांनुसार, हे सर्व अर्ज संबंधित ईआरओ/एईआरओ (ERO/AERO) यांच्याकडून सात दिवसांनंतर निकाली काढले जातील. तसेच, एसआयआर (SIR) आदेशांनुसार १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीतील कोणतेही नाव योग्य तपासणी आणि संधी दिल्यानंतरच वगळता येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ