औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकला मिळणार अधिक गती – उद्योग मंत्री उदय सामंत

कौशल्य विकास केंद्रच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

नाशिक, दि.11 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा):   नाशिक शहराला कुंभमेळाची पार्श्वभूमी आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकची भूमी पोषक आहे. आगामी काळात नाशिकमध्ये विविध औद्योगिक प्रकल्प येणार असून विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक गती मिळणार आहे, असे प्रतिपादन उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर येथील भूखंड क्रमांक 1 येथे महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या  कौशल्य विकास केंद्राच्या नूतन इमारत लोकार्पणप्रसंगी उद्योग मंत्री डॉ. सामंत बोलत होते. या सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, आमदर दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजी  नगरचे मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे, उपकार्यकारी अधिकारी संतोष भिसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे  प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, इड्यूस पार्कचे प्रमुख कमलजित सिंग गुप्ता, संचालक डॉ. मुकुंद शिंदे, यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी उपस्थित होते.

उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे, या  शासनाच्या संकप्लनेतूनच आज या महामंडळाच्या माध्यमातून पहिल्या कौशल्य विकास केंद्राची सुरवात नाशिकमध्ये होणे ही बाब अभिमानास्पद आहे. उद्योगांना त्यांच्या आवश्यतेनुसार लागणाऱ्या विकसित कौशल्ये आत्मसात केलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती या कौशल्य विकास केंद्रातून होणार असून रोजगाराच्या विविध संधी याद्वारे उपलब्ध होणार आहेत. राज्यात प्रत्येक विभागस्तरावर पाच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या तीन ते चार वर्षात 8 हजार विद्यार्थी प्रशिक्षित होणार आहेत.

नाशिक महानगरपालिकेने निश्चित केलेल्या जागेवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेचे कामही हाती घेण्यात आहे. या प्रदर्शन केंद्राचा वापर प्रदर्शने व औद्योगिक कार्यक्रमांसाठी 11 वर्षे करता येणार असून 12 व्या वर्षी नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळासाठी हे सुर्पूत करण्यात येणार आहे. कुंभमेळा काळात याठिकाणी टेंट सिटी करण्यात येणार असून कुंभमेळासाठी जगभरातून येणाऱ्या उद्योजकांच्या निवासाची सोय टेंट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामुळे येणारे उद्योजकांच्या माध्यमातून नाशिकमध्ये नवीन उद्योग येतील हा यामगील दृष्टिकोन आहे. नाशिक शहरात जांबुटके या ठिकाणी पहिले आदिवासी क्लस्टर साकरले जाणार असून यासाठी 74 एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. राज्यातील हे पहिले आदिवासी क्लस्टर असणार आहे व या क्लस्टरमुळे आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येवून नवीन उद्योजक तयार होणार असल्याचे उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.

एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) मध्ये द्राक्ष घटकाचा समावेश करण्यात आला असून नाशिकमध्ये वायनरी उद्योगासही अधिक मजबुती मिळणार आहे. नाशिकमध्ये उद्योगवाढीस चालना मिळण्यासाठी  मापारवाडी, इगतपुरी, राजूर बहुला, जांभुटके, मालेगाव, सिन्नर येथे जागा संपादित करण्यात येत आहे. मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात एमआयडीसीच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या रस्ते तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे. अशी माहिती उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी दिली.

नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

आज उद्योग‍ विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात उद्योगाची क्रांती निर्माण झाली असून नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर राहिले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या कौशल्य विकास क्रेंद्राच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना सर्व सुविधासह उत्तम प्रशिक्षण मिळणार असून कुशल कामगार तयार होणार आहे. उद्योग क्षेत्रासोबतच  शेती क्षेत्राशी संबंधित उद्योगांनाही उभारी देण्यासाठी उद्योग विभागाने चालना द्यावी अशी भावना शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.

स्पर्धेच्या युगात नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक – मंत्री नरहरी झिरवाळ

स्पर्धेत टिकायचे असेल, तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक कौशल्ये विद्यार्थांनी आत्मसात केली पाहिजेत. महिला उद्योजकांनी यात सहभागी होवून पुढे येणे गरजेचे आहे. नाशिकला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने  वातावरण पोषक आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातही उद्योग उभारणीसाठी चालना द्यावी, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे यांनी केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचे फित कापून उद्घाटन करण्यात आले व कोनशिला अनावरण करण्यात आले.
000