‘कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५’चे १३ ऑगस्ट रोजी उद्घाटन

मुंबई, दि. ११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त ‘कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५’ चे आयोजन महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करणाऱ्या या महाकुंभचे उद्घाटन बुधवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथील क्रीडा संकुलात याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात एकूण १६ प्रकारच्या पारंपरिक क्रीडा स्पर्धा होणार असून, यामध्ये मल्लखांब, कबड्डी, खो-खो, भालाफेक, विटी – दांडू, कुस्ती, लगोरी,  लंगडी, रज्जूमल्लखांब, पारंपारिक धाव स्पर्धा यांचा समावेश आहे.

पारंपारिक खेळांचे जतन आणि प्रसार हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभमध्ये युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरूस्ती, संघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी या उपक्रमात जवळपास एक लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदादेखील राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू यात सहभागी होणार असून खेळाडूंना पारंपरिक खेळांविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/