ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आमदार वरुण सरदेसाई, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते दक्षिण आफ्रिकेतील ८९ कि.मी. अंतराची The ultimate Human race नावाने ओळखली जाणारी खडतर मॅराथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून सिल्वर मेडल मिळविल्याबद्दल तहसीलदार युवराज बांगर यांचा तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) मध्ये शहरी गुणवत्ता यादीत राज्यात नववा क्रमांक मिळाल्याबद्दल आणि मुंबईतून पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबादेवी विद्या निकेतन, बोरीवली (प) शाळेतील कु. स्नेहजा प्रसाद बापट हिचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा सांख्यिकी उपसंचालक कार्यालयामार्फत उपसंचालक भूषण देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.शिंदे आणि सहकाऱ्यांनी तयार केलेल्या ‘शाश्वत विकास : ध्येय, प्रगती मापन अहवाल’ या पुस्तकाचे; सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयामार्फत ‘महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ‘एकत्रित समग्र वाङमय’ चे प्रकाशन करण्यात आले. तर, सामाजिक न्याय विभागामार्फत ‘घर घर संविधान’ फोटो फ्रेमचे आणि संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री श्री. शेलार यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/