- सर्वांच्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करुन चेहरा-मोहरा बदलणार
- १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ‘बीड-अहिल्यानगर’ रेल्वे सुरु होणार
बीड, दि. १५ (जिमाका): बीड जिल्ह्याच्या कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्रीडा आदी क्षेत्रातील सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन याकरीता सर्वत्तोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री पवार यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देत म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीर, क्रांतीकारक, हौतात्म्य पत्करलेल्या शहिद वीरांना अभिवादन केले आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी वचनबद्ध होऊया, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देऊया. स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव तितक्याच उत्साहात, आनंदात, व्यापक स्वरुपात साजरा करायचा आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपण दृढसंकल्प करुया की, राष्ट्रविकासात सर्वांना सोबत घेऊन जाताना शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांना प्रगतीची योग्य संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांचे आर्थिक-सामाजिक सक्षमीकरण करायचे आहे. देशाचे स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मूल्ये अबाधित राखणे, भारतीय राज्यघटनेवरचा विश्वास अधिक दृढ करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आजवर सर्वोच्च त्याग केला, अमूल्य योगदान दिले. त्या सर्वांबद्दल आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया.
मराठवाड्याची भूमी ही संतांची, शूर-वीरांची, बुद्धीवंत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. मराठवाड्याला सहजासहजी काही मिळालं नाही, जे काही मिळालं ते संघर्ष करुनच मिळाले आहे. देशाला 15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु मराठवाड्याला 17 सप्टेंबर, 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी सर्वसामान्य जनतेला, निजामाच्या सैन्याशी लढावे लागले. त्या त्यागाचं स्मरण करुन, त्यांना अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते. तसेच दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम साथ दिली होती. मराठवाडा मुक्तीसंग्रामात प्रत्येक गावातल्या लोकांनी सहभाग घेतला होता, हे या लढ्याचे वैशिष्ट्य होते. आपल्या बीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजामाच्या रोहिल्यांना जेरीस आणण्याचं काम केलं होतं. त्यांच्यासोबत काशिनाथ जाधव आणि हिरालाल कोटेचा हे भूमिपुत्र देखील लढ्यात अग्रभागी होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आजच्या या स्वातंत्र्य दिनी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी, आपणांस विश्वास देतो की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करुन चेहरा-मोहरा बदलायाचा आहे. बीड जिल्ह्यासाठी आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीड विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यासाठी जागा निश्चिती आणि पूर्वव्यवहार्यता चाचणीसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘बीड-अहिल्यानगर’ रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
जिल्ह्यातील युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयडीसी यांच्या सहकार्याने सुमारे 196.98 कोटी रुपयांचा ‘सीट्रीपलआयटी’ हा प्रकल्प उभारण्यात येणार असून नुकतचे याचे भूमिपुजन झाले आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित 351 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बीडमधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात महसूल भवनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे. मागील आठवड्यात मी जिल्हा दौऱ्यावर असतांना प्रत्येक विभागातील विकासकामांचा आढावा घेतला आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली. लवकरच याठिकाणी अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठीच्या सुसज्ज इमारती तयार होणार आहेत. तसेच बीडमध्ये एक भव्य आणि अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकार भवनाची उभारणीही होणार असून, सहकार क्षेत्रातील सर्व कामकाज एका छताखाली सुलभपणे पार पडण्यास मदत होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संकुलातील विविध सुविधांचा विकास आणि विस्तारीकरण करण्यात येणार आहे. खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षणाची साधने आणि उत्कृष्ट पायाभूत व्यवस्था मिळणार आहे.
आपला महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य असून शेतीच्या बरोबरीनं पशुधनाचा विकासही महत्त्वाचा आहे. त्यामुळे परळी येथे होणाऱ्या नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांमुळे पशुपालकांना अत्याधुनिक, दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणार असून, राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातल्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी आणि विकासासाठी हे पशुवैद्यकीय महाविद्यालयअत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. महसूल विभागाने ‘जनता दरबार’, ‘सेवामित्र चॅटबोट’, ‘जिवंत 7/12’ मोहिम, ‘महसूल सप्ताह’, आणि विवादग्रस्त फेरफारांचे तात्काळ निवारण हे उपक्रम सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी राबवलेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासण्या, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र, ‘कायाकल्प’ पुरस्कार, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमधील 94 टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती, ‘लखपती दीदी’ योजना, अंगणवाडी बांधकाम या उपक्रमांनी ग्रामीण जीवनमान उंचावले आहे.
पोलीस विभागाच्या ‘संवाद QR कोड’, ‘सुगम संपर्क’, ‘थर्म नेम प्लेट’, ‘पोलीस आपल्या बांधावर’ अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे, तर गंभीर गुन्ह्यांत घट झाली आहे.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत एका दिवसात 30 लाख झाडे लावून आपल्या बीड जिल्ह्यानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. येणाऱ्या कालावधीत आपण बीड जिल्ह्यात एक कोटी झाडे लावून ती जगवणार आहोत. या हरित चळवळीत प्रत्येक बीडकरांनी आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सहकार विभागाने ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कठोर पावले उचलली असून, सर्वसामान्य जनतेचा पैसा त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच महावितरण विभागाने भविष्यातील विजेची गरज ओळखून सौर कृषी पंप, पारेषण यंत्रणा बळकटीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातही आपण मोठी झेप घेत असून, अंबाजोगाई येथील मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये हृदयरोग निदान आणि उपचारासह अनेक असाध्य आणि दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा बीडमध्येच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयातील 100 बेडचे कार्डीयाक कॅथलॅब, वाढीव खाटांचे रुग्णालय, ‘एमआरआय’, माता-बाल संगोपन रुग्णालय, डायलिसीस सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार असुन, याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही. या सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली असून, 4 हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना 18 कोटींपेक्षा जास्त विद्यावेतन अदा केले आहे. तसेच जिल्हा उद्योग भवन बांधकामासाठी 32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाचे स्व:ताच्या हक्काचे घर असावे, हे आमचे ध्येय असल्याचे सांगत, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सन 2024-25 मध्ये सुमारे 98 टक्के आणि सन 2025-26 मध्ये 90 टक्क्यांहून अधिक घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यामुळे हजारो कुटुंबांचे कायमस्वरूपी निवाऱ्याचे स्वप्न साकार झाले आहे. रमाई आवास योजनेतही पाच हजारांहून अधिक घरांना मान्यता देण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘लखपती दिदी’ हा उमेद अभियानाचा उपक्रम बीडमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला असून, राज्याच्या उद्दिष्टापेक्षा चांगली कामगिरी करून आपल्या बीड जिल्ह्यातील बहुसंख्य महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करुन आपले उत्पन्न वाढवले आहे.
हे सर्व प्रकल्प आणि उपक्रमही बीडच्या विकासयात्रेची नवी सुरुवात असून, आपण सर्वजण मिळून, लोकशाहीच्या बळावर, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, शेती-उद्योग-शिक्षण-आरोग्य-पर्यावरण या सर्वच क्षेत्रात बीड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या प्रगत जिल्ह्यांच्या अग्रस्थानी आणुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याशी संवादही साधला व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, माननीय खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि पत्रकार यांची उपस्थिती होती.
०००