परभणी जिल्ह्याची विकासाकडे गतीने वाटचाल – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ 

परभणी, दि. १५ (जिमाका): आपला परभणी जिल्हा गतीने विकासाकडे वाटचाल करीत आहे. शेती, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, आरोग्य आदींसह विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती होत आहे. आगामी काळातही विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून परभणी जिल्हा विकासात पुढे राहील, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

 

भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यमंत्री साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार पडले. यानंतर जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार फौजिया खान, आमदार राहूल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, आदींसह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री आपल्या संदेशात म्हणाल्या की, स्वातंत्र्य दिवस आपल्या सर्वांसाठीच अमूल्य आहे. हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतो. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरपुत्रांना मी नमन करते. त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानही अत्यंत मोलाचे आहे व यापासून युवा पिढीने अवश्य प्रेरणा घेतली पाहिजे.  सध्या ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रमही राबविण्यात येत आहे. या उपक्रमात परभणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, याबद्दल मी आभारी आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पीक परिस्थितीही चांगली आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती समृद्ध करावी, असे आवाहन करुन पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या की, शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी होती की, दिवसा वीज मिळाली पाहिजे. ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सबस्टेशन सोलारवर आणण्यात आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी असणारी “मागेल त्याला सौर कृषी पंप” या योजनेचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. तसेच हरित ऊर्जेसाठी “प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना” ही सर्वांसाठीच राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करावा. जिल्हाभरात नवीन वीज उपकेंद्र स्थापित करणे, वाहिनी विलगीकरण, गावागावांमध्ये ए.बी.केबल टाकणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत. मला सांगण्यास आनंद वाटतो की, आगामी 50 वर्षात जिल्ह्याला विजेची कुठलीच समस्या भासणार नाही, या पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक गतिमानकारकरित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी, यासाठी राज्य, महसूल विभाग, जिल्हा व तालुका अशा चार स्तरांवर लोकांना स्वयंस्फूर्तीने सहभागी करून घेण्याकरीता राज्यात चालु वर्षापासुन प्रथमच “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावा-गावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणे, सुशासन प्रस्थापित करणे आणि गावाला आत्मनिर्भर करणे हा आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानात जनतेने अवश्य सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. नुकत्याच पार पडलेल्या महसूल सप्ताहात प्रशासनाने विविध लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवून सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना फार मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. महिला बचत गट अधिक सक्षम करण्याबरोबरच लखपती दीदी योजना, महिलांची क्रेडीट सोसायटीसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी त्यांनी ग्वाही दिली.

राज्यातील महिलांच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणुन घेऊन त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी चालू वर्षापासून “आदिशक्ती अभियान” राबविण्यात येणार आहे. तसेच या अंतर्गत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना, उपक्रम, कार्यक्रम आदींच्या जनजागृतीसाठी ग्रामस्तरीय समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा देखील अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. परभणी येथे 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय देण्याचेही मुख्यमंत्री यांनी मान्य केले आहे. हिमोफेलीया रुग्णांसाठी लागणारे हेमलिब्रा इंजेक्शन प्रथमच आपल्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्यामुळे रुग्णांना आता जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज नाही. आरोग्य सेवांच्याबाबतीत आपला जिल्हा निश्चितपणे आघाडीवर राहिल, असे पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर यांनी सांगितले.

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहिमेतंर्गत राज्यभर दि. 22 जुलै ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत मोतीबिंदू तपासणी निदान, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या अंतर्गत 90 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. राज्य शासन “एक पाऊल थॅलेसीमिया मुक्तीकडे”  हे राज्यव्यापी अभियान राबवित आहे. थॅलेसीमिया हा एक रक्तविकार आहे, मात्र नियमित रक्त संक्रमण व उपचाराने रुग्णाचे आयुष्य सुधारु शकते, या अभियानाचा रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करुन पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या की, रक्तदाब व मधुमेहामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाठी व मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरीता महाराष्ट्रात प्रथमच परभणी जिल्ह्यातील उच्च रक्तदाब व मधुमेही रुग्णांना आशा स्वयंसेविकामार्फत घरपोच औषधी किट दिली जाणार आहे, याचा लाभ रुग्णांनी घेऊन आपले शरीर निरोगी ठेवावे.

समाजातील मागासवर्गीयांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ विद्यार्थी, नागरिकांनी अवश्य घ्यावा. जिल्ह्याच्या क्रीडा विकासावरही प्राधान्याने भर दिला जात आहे. खेळाडूंसाठी प्रशस्त क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे, याकरीता कृषी विद्यापीठाकडून सुमारे 25 एकर जागा मिळावी म्हणून शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. गाव तेथे क्रीडांगण व व्यायामशाळा उभारण्याचे नियोजन जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आले आहे व यासाठी  280 लक्ष रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे. स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना आदी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. कामगारांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्याचा लाभ कामगारांनी घ्यावा. जिल्ह्यात गुंतवणुक व निर्यात वाढीकरीता प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. जल जीवन मिशन कार्यक्रमातंर्गत ग्रामीण भागातील सर्व घरांना पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत दोन लाख 59 हजार घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. लवकरच उर्वरित नळ जोडण्या पूर्ण करण्यात येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी  पोलीस यंत्रणा सदैव  सक्रीय असते. आपल्या जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे, असे पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर यांनी आवाहन केले.

तत्पुर्वी पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, उपस्थित नागरिकांची भेट  घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात लघु उद्योजक, राष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त खेळाडू,  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी-कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. अवयवदान करणाऱ्या दिवंगत व्यक्तींच्या नातेवाईकांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  तसेच रक्तदाब व मधुमेहामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाठी व मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरीता महाराष्ट्रात प्रथमच परभणी जिल्ह्यातील उच्च रक्तदाब व मधुमेही रुग्णांना आशा स्वयंसेविकामार्फत घरपोच औषधी किट दिली जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेतंर्गत निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शासनाकडून प्राप्त झालेले आधार संच आधार केंद्रचालकांना वाटप करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.

०००