कुंभमेळ्यातील विकास कामे वेळेत पूर्ण करावेत – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

विभागीय आयुक्त कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठक

नाशिक, दि. १५ : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६- २०२७ मध्ये होणाऱ्या  कुंभमेळ्यानिमित्त भूसंपादनासह विविध विकास कामांना गती द्यावी. सर्व कामांचे नियोजन करीत ती कालबद्ध वेळेत पूर्ण करावीत. सर्व कामे गुणवत्तापूर्ण होतील याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिले.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज सकाळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगर पालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त करिष्मा नायर, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळा विकास कामासंदर्भात कोणताही विलंब नको. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. विकास कामे नियोजनबद्ध व दर्जेदार  होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ही कामे पूर्ण करताना त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. त्यातही  रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच कुंभमेळ्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.
आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संनियंत्रण करावे. तसेच त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. या बैठकीत रिंग रोड भूसंपादन, त्र्यंबकेश्वर – गोदावरी पाणीपुरवठा योजना, घाटांचे बांधकाम, साधुग्राम भूसंपादन, रस्ते बांधकाम, रेल्वे स्थानक, ओझर विमानतळ विकास कामे आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, श्रीमती नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक श्री. पाटील, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के यांनी आपापल्या विभागांतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
00000