पालकमंत्री कार्यालयामार्फत नागरिकांचे प्रश्न सोडविणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री कार्यालयाचे स्वातंत्र्य सैनिक व भारतीय लष्करातील माजी सैनिकांच्या हस्ते उद्घाटन

सातारा दि. १५:  जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण करुन त्या ठिकाणी पालकमंत्री कार्यालय सुरु करण्यात आले आहे. अत्यंत देखण्या आणि ऐतिहासिक सौंदर्य जपणाऱ्या  कार्यालयाच्या उद्घाटनाचा मान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारतीय लष्करातील माजी सैनिक यांना दिला त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मिल्लाकर्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव आदी उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालकमंत्री कार्यालयात बसण्याचा मान पहिल्यांदा स्वातंत्र्य सैनिक व माझी सैनिकांना देण्यात आला आहे. या कार्यालयात 10 दिवसात अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात येवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी, प्रश्नांची रितसर दखल घेवून सोडविण्यात येतील.

नागरिकांच्या काही तक्रारी किंवा प्रश्न असतील तर ते हक्काने मांडा, असे आवाहन करुन हे जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री कार्यालय पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. रोकडे व कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांनी मेहनत घेतली. त्यांच्या मुळे पालकमंत्री भवनाची कामे वेळेत पूर्ण झाली.
0000