- राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार
- व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज
- कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध
- नागरिकांचा वेळ वाचणार
हिंगोली, दि. १५ (जिमाका): जिल्ह्यातील नागरिक व्हॉट्स अँप टेक्नोसेव्ही झाल्यामुळे त्यांना बदलत्या काळानुसार ऑनलाईन घरपोच सेवा मिळवून देण्यासाठी ‘सेवादूत हिंगोली’ प्रणाली व व्हॉटस्अप चॅटबोटच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाला.
यावेळी व्यासपीठावर सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपस्थित होते.
राज्यात प्रथमच अनोख्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाईन नागरिकांना सेवा पुरविण्यात येत असून, सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनातील 13 विभागाच्या सेवा या प्रणालीतून पुरविण्यात येत आहेत. ही सेवा व्हॉट्स ॲप व संकेतस्थळावर उपलब्ध असून, टप्प्याटप्प्याने सर्वच सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची सेवा घेतल्याचे ते म्हणाले.
हिंगोली जिल्हा प्रशासनाने सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल पालकमंत्री झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी गुप्ता यांचे विशेष कौतुक करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सेवाही तात्काळ ऑनलाईन सुरु करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सेवादूत उपक्रम राज्यातील इतरही जिल्ह्यात राबविणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ही सेवा व्हॉट्स अँप चँट बोट्स (9403559494) आणि संकेतस्थळावरही सुरू असून, नागरिकांना ऑनलाईन अर्ज करून कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याचे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून अर्जदार नागरिकांना हवी असलेली सेवा, लागणारी आवश्यक कागदपत्रे, ती सादर करण्यासाठी अपॉईंटमेंट घेण्याची वेळ आणि सेवा पुरविण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले शुल्क याची माहितीही मिळणार असून ही माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत आपले सरकार सेवा केंद्र चालक आपल्याला फोन करून आपण निवडलेल्या वेळेस व दिवशी आपल्या घरी येऊन आपण निवडलेल्या सेवेसाठी सर्व प्रक्रिया आपल्या घरीच पूर्ण करून घेतील तसेच निवडलेल्या सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काची आणि कागदपत्रांची माहिती सुद्धा आपल्याला नोंदणी करत असतानाच मिळणार आहे. तेवढेच शुल्क आपणास आपल्या घरी येणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र धारकाला द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे आपण निवडलेली प्रमाणपत्रे शासनाच्या नियमानुसार तयार झाल्यानंतर आपल्या घरी तोच आपले सरकार सेवा केंद्राधारक घरपोच आणून देणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना सांगितले.
तक्रार प्रणालीही आता व्हॉट्स अँप
‘सेवादूत हिंगोली’ या उपक्रमाप्रमाणेच अर्जदार नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, प्रशासनातील विश्वास व पारदर्शकता वाढवणे तसेच हिंगोलीला तक्रारमुक्त जिल्हा बनविण्यासाठी व्हॉटस्अप बेस तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. यासाठी 8545088545 हा व्हॉट्सअप क्रमांक विकसित करण्यात आला आहे. ही प्रणाली आजपासून सुरु होणार आहे.
या प्रणालीवर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर “Hi” असा मेसेज पाठवायचा. त्यानंतर तुमच्यासमोर एक मेनू येईल, ज्यात तक्रार नोंदविण्याचा पर्याय असेल. तुम्ही ज्या खात्याबाबत तक्रार करीत आहात ती निवडून तक्रारीचे तपशील, फोटो किंवा कागदपत्रे असल्यास ती अपलोड करता येतील. तक्रार आपोआप संबंधित विभागाकडे पाठवली जाईल. आठ दिवसांच्या आत समस्येवर कारवाई करून त्याचा अहवाल तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. कुठूनही, कधीही तक्रार नोंदवण्याची सुविधा असल्यामुळे वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचतो. पारदर्शक प्रक्रिया असून प्रत्येक टप्प्याची माहिती व्हॉट्सॲपवर तक्रार क्रमांक (ट्रैकिंग आयडी) मिळतो, ज्यामुळे प्रगती पाहता येते. यामुळे शासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधता येणार आहे.
से टू हाय कलेक्टर – लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन
केसेसची संभाव्य सुनावणीची वेळ पक्षकार तसेच वकिलांना उपलब्ध होऊन त्यांच्या वेळेचे योग्य नियोजन करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत से टू हाय कलेक्टर-ईक्यूजे कोर्ट लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून केसच्या आदल्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता केसेसचा बोर्ड सॉफ्टवेअर व मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. या सॉफ्टवेअर व मोबाईल ॲप्लिकेशन हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील व मंडळ अधिकारी कार्यालयाकडून वापरण्यात येणार आहे. यामध्ये महसूल अर्धन्यायिक, राष्ट्रीय महामार्ग लवाद, पुरवठा विभाग, सरफेशी (बॅकेशी निगडीत प्रकरणे), राज्य उत्पादन शुल्क इत्यादी विभागांची प्रकरणे हाताळली जाणार आहेत.
०००