जळगाव दि. १८ (जिमाका): जळगाव जिल्ह्यातील सैन्यात सेवारत असताना युद्ध व युद्धजन्य परिस्थितीत धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या शहीद स्मारकांसाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे २९ स्मारकांसाठी एकत्रित ४३५ लाख रुपये ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून उपलब्ध करून देण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या गावांमध्ये प्रेरणादायी स्मारकांची उभारणी होणार आहे.
रविवार १७ रोजी जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत या स्मारकांना मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याला अनुसरून आज शासनस्तरावरून मंजुरी कळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा नियोजन अधिकारी यांना शासनाने याबाबत आदेश कळवले आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील २९ ठिकाणी ऐतिहासिक व प्रेरणादायी शहीद स्मारक उभारले जाणार असून, शहीद कुटुंबांचा सन्मान आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारी स्मारके गावोगावी उभी राहणार आहेत.
०००