नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रशासनाच्यावतीने शोध व बचावकार्य सुरु

  • नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करु नये
  • नदी नाल्यावर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नये

नांदेड दि. १८: जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून अतिवृष्टी सुरु आहे. अनेक तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे. यामुळे विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रात पाऊस आणि विसर्ग दोन्हीही वाढले आहेत. विष्णूपुरी प्रकल्पाच्यावरच्या भागातील सिद्धेश्वर व येलदरी धरण भरले आहेत. त्यांचा विसर्गही वाढलेला आहे. त्यामुळे विष्णूपुरी धरणाचे 8 गेट उघडले असून 94 हजार क्युसेक वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हा विसर्ग आता वाढविण्यात येणार असून 1 लाख 25 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड शहर व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुक्यात आणि कर्नाटकच्या बिदर तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद मंडळात 206 मी.मी पावसाची नोंद झाली. यामुळे लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रातील रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी घुसले. रावणगावमध्ये 225 नागरिक अडकले होते. हसनाळमध्ये 8 नागरिकांनी बुरुजावर आश्रय घेतला, तर रावणगावमध्ये मशिदीवर 4 तर झाडांवर 8 नागरिक अडकले होते. भिंगोलीत साधारण: 40 नागरिक अडकले होते. यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली होती. सकाळपासून महसूल व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम कार्यरत आहे. यासोबतच पोलीसांची एक टीम कार्यरत असून आर्मीची एक टीम या गावामध्ये पोहोचली आहे. सकाळपासून सुरु झालेल्या एसडीआरएफ टिमने शोध व बचावकार्य केले आहे. अजूनही रावणगावमध्ये 80 ते 100 लोक पुराच्या पाण्याने वेढलेले असून दोन तासात या नागरिकांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आतापर्यत 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिली.

पैनगंगा प्रकल्पांची परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून विसर्ग वाढल्यानंतर काही समस्या उदभवू नये यासाठी तेलंगणातील पाटबंधारे विभागाच्या सचिवाशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन बिदर व लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

अतिवृष्टी व सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी,नाल्यांना पूर आला आहे. नागरिकांनी पुराचे पाणी आलेल्या ठिकाणावरुन वाहने चालवू नये. तसेच पूर पाहण्यासाठी किंवा धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी अतिउत्साहात पाण्यात जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले आहे.

०००