यवतमाळ, दि.१८ (जिमाका): वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी होता. शेतकऱ्यांना समोर ठेऊन ते धोरण आखायचे. त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आणली. शेती, सिंचन, वीज, उद्योग असे राज्याच्या विकासासाठी त्यांनी सर्वांगीण काम केले. राज्याच्या जडणघडणीत त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री राठोड बोलत होते.
कार्यक्रमास पुरस्कार वितरण सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार बाबूसिंग महाराज, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार डॉ.संदीप धुर्वे, विजय खडसे, निलय नाईक, ख्वाजा बेग, महाराष्ट्र राज्य हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, डॉ.टी.सी.राठोड, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, दिपक आसेगावकर, ॲड.आशिष देशमुख, महंत जितेंद्र महाराज आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी नाईकसाहेबांनी चार कृषी विद्यापीठे निर्माण केली. दुष्काळाच्या काळात अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेसाठी मोठे काम केले. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारे बियाण्यांचे संकरीत वाण त्यांनी आणले. दुष्काळात मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमीसारखी योजना आणली. बियाणे महामंडळाची स्थापना त्यांनी केली. त्यांनी आणलेले पंचायत राज व्यवस्थेचे धोरण तर आज संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा विस्तार नाईकसाहेबांनी केला. प्रत्येक शेतकऱ्यास सिंचनासाठी वीज उपलब्ध झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका असल्याचे औष्णिक वीज प्रकल्पांना त्यांनी चालना दिली. कापूस खरेदीत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी कापूस एकाधिकार योजना राबविली. त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प सुरु केले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी बाजार समित्या निर्माण झाल्या पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आज त्यांचा स्मृतीदिन तर आहेच, त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा दिवस देखील असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
नाईकसाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या नावे असलेला पुरस्कार देऊन प्रयोगशील शेतकरी व कृषी शेतकऱ्यांचा आपण गौरव केला. हा केवळ सन्मान नाही तर भविष्यातील पिढीसाठी प्रेरणेचा ठेवा आहे. हे प्रयोगशील शेतकरी नाईकसाहेबांच्या कार्याचा वारसा पुढे नेणार आहे. गहूली सारख्या लहानशा गावातून सुरुवात करुन साहेबांनी तब्बल अकरा वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यांचे काम केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात होते, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
माळपठारावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवणार
माळपठारावरील ४० गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आपल्या भाषणात निलय नाईक यांनी केली होती. त्याअनुषंगाने बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी मी आणि इंद्रनील नाईक दोघेही जलसंधारण विभागाचे मंत्री आहोत. आमच्या विभागाच्या वतीने माळपठारासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी कितीही निधी लागला तरी उपलब्ध करुन देऊ आणि माळपठारचा पाणी प्रश्न सोडवू, असे सांगितले. पुसद जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, वसंतराव नाईकसाहेबांना पाऊस फार आवडायचा. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री निवासस्थानाचे नाव ‘वर्षा’ असे ठेवले. त्यांनी राज्यात हरितक्रांती आणली, धरणे बांधले, रोजगार हमी योजना सुरु केली, पंचायतराज व्यवस्था निर्माण केली. सुधाकर नाईक साहेबांच्या संकल्पनेतून वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान सुरु झाले. या प्रतिष्ठानच्यावतीने आतापर्यंत ५८५ शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला असल्याचे इंद्रनील नाईक म्हणाले. यावेळी आमदार बाबूसिंग महाराज व माजी आमदार निलय नाईक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
शेतकरी, कृषी शास्त्रज्ञांचा पुरस्काराने गौरव
पालकमंत्री संजय राठोड व मान्यवरांच्या हस्ते शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याच्या विविध भागातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचा वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात विनोद संपतराव तोडकर कासेगाव, जि.सांगली, जनार्दन संतराम अडसूळ तरडगाव, जि.सातारा, रमाकांत काशिनाथ बागुल कुसुंबा, जि.धुळे, वंदना प्रभाकर पाटील पळासखेडा, जि.जळगाव, दादासाहेब दौलतराव शिंदे सिंदोन, जि.छत्रपती संभाजीनगर, बालाजी दत्तराव महादवाड डोंगरगाव, जि.नांदेड, कुंदन देवराव वाघमारे गीताई नगर, जि.वर्धा, नरसिंग थावरा जाधव जवळा, जि.यवतमाळ या शेतकऱ्यांना समावेश आहे. तसेच कृषी शास्त्रज्ञांमध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जि.सातारा येथील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ.दत्तात्रय साहेबराव थोरवे, प्रोत्साहनार्थ पुरस्कार ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे प्रा.निलेश अशोक नलावडे, समाज माध्यम शेतकरी मार्गदर्शक पुरस्कार बालिंगे जि.कोल्हापूर येथील सागर बापूसो कोपर्डेकर यांना देण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामासाठी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिपक आसेगावकर व माजी प्राचार्य डॉ.उत्तम रुद्रावार यांना सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वसंत वैभव स्मरणिकेचे प्रकाशन
सुरुवातीस वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या कार्यावर आधारित ‘वसंत वैभव’ या स्मरणिकेचे प्रकाशन पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रा.दिनकर गुल्हाने यांनी स्मरणिकेचे संपादन केले. कार्यक्रमाचे संचलन डॉ.माधवी गुल्हाने व प्रा.संजय चव्हाण यांनी केले. आभार प्रा.गोविंद फुके यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००