- लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे प्रस्तावित करण्याचे निर्देश
- जिल्हा वर्षिक योजनेंतर्गत १ हजार ३२७ कोटी नियतव्यय मंजूर
नागपूर,दि. १८: महानगराचा वाढता विस्तार व जवळ असलेल्या सर्व खेड्यांमधून महानगरात जाण्या-येण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांना परिपूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधेची नितांत गरज असून यासाठी परिपूर्ण सुविधा लवकर निर्माण करु, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नियोजन भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, परिणय फुके, कृपाल तुमाने, विधानसभा सदस्य सर्वश्री नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास ठाकरे, प्रविण दटके, आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर, समीर मेघे, संजय मेश्राम, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू व वरिष्ठ अधिकारी जिल्हयातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शिक्षण व रोजगारासाठी विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात नागपूर महानगराच्या विविध भागात वर्दळ वाढलेली आहे. सद्यस्थितीत महानगर व शेजारील नगरपंचायतीच्या हद्दीत मेट्रो, मनपा, एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे सार्वजनिक वाहतूक होत आहे. ग्रामीण भागाला या वाहतूक सुविधेशी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने जोडण्याची आवश्यकता आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन महानगरपालिका, नागपूर महानगर विकास प्राधिकरण, एसटी महामंडळ व मेट्रोच्या समन्वयातून अधिकाधिक उत्तम सुविधा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले
स्थानिक पातळीवर दर कमी असतील व सेवा उत्तम असेल तर स्थानिक पातळीवरुन निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी सोईची
जिल्हा वार्षिक व इतर योजनांच्या माध्यमातून कार्यालयीन सुविधेच्या दृष्टीने विविध साहित्य व उपकरणांची खरेदी ही जेम्स प्रणालीमार्फत केल्या जाते. अलीकडच्या काळात जेम्समार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या साहित्यांचे दर हे स्थानिक अधिकृत कंपन्यांच्या पुरवठादारांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येतात. याचबरोबर पुरवठा पश्चात ज्या सुविधा व सेवा आवश्यक असतात त्याची पुर्तता होत नसल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. याबाबीचा गांभीर्याने विचार केल्यानंतर निर्णय घेणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारपेठेत जेम्सपेक्षा कमी दर असतील तर तुलनात्मकदृष्टया विचार करुन शासन निर्णयाप्रमाणे निविदा प्रक्रिया राबवून स्थानिक पातळीवरुनच खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
नगरपंचायत, नगरपरिषदेच्या मोकळ्या भूखंडावर सीमांकन करुन बोर्ड लावण्याचे निर्देश
नगरपरिषद, नगरपंचायतीच्या मालकीचे अनेक ठिकाणी मोकळे भूखंड आहेत. या जागा मोजमापासह निश्चित करुन त्यावर नगरपरिषदेच्या मालकीचा तत्काळ फलक लावण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. या जागांवर होणारे अतिक्रमण टाळता यावे, जागांची सुरक्षितता करता यावी यासाठी त्यांनी हे निर्देश दिले.
अंगणवाड्या सुंदर होणार
महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या या अधिक चांगल्या होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी लक्ष देण्याच्या सूचना बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी केल्या. जिल्हा परिषदेअंतर्गत एआय अंगणवाडीच्या धर्तीवर अंगणवाड्या होणे आवश्यक आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागासह जिल्हा वार्षिक योजनामधून निधी उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था अधिक भक्कम करु
ग्रामीण भागात कृषी क्षेत्राला पुरेशी विज व सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणावर भर दिला जाणार आहे. ज्या भागामध्ये भूजल पातळी 800 फूटावर गेली आहे त्या भागात सक्षम सौरपंपासह इतर पर्यायांचा विचार केला जाईल. याचबरोबर सद्यस्थितीत कालव्यांची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या सर्व कालव्यांबाबत एक व्यापक नियोजन तयार करुन कृषी क्षेत्रासाठी जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था अधिक भक्कम केली जाईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. या बैठकीत अंबाझरी उद्यान, खतांचा पुरवठा नागलोक बुध्दभूमी विकास जलसंधारणाची कामे, सिसिटिव्ही व सुरक्षा, पाणी पुरवठा आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
सन 2024-25 च्या झालेल्या खर्चाला मंजूरी
जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक कार्यक्रम या योजनांकरिता रुपये 1 हजार 219 कोटी लक्ष नियतव्यय खर्चाला मंजूरी देण्यात आली. प्राप्त तरतुदीपैकी माहे मार्च, 2025 अखेर रुपये 1 हजार 218 कोटी 83 लाख 21 हजार निधी खर्च झालेला आहे. वितरीत तरतुदीशी खचांची टक्केवारी 99.99 एवढी आहे. सदर खर्चाला मंजुरी प्रदान करण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी 1 हजार 47 कोटी, अनुसुचित जाती उपयोजनेसाठी 195 कोटी, आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 85 कोटी असा एकूण 1 हजार 327 कोटी नियतव्यय मंजूर आहे. यातील 30 टक्के निधी प्राप्त झाला आहे.
5 रुग्णवाहिकांचे लोकार्पण
आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित जिल्हा नियोजन निधीअंतर्गत प्राप्त अनुदानातून एकूण 5 नव्या रुग्णवाहिका जिल्हा स्तरावर खरेदी करण्यात आल्या. त्यांचे लोकार्पण आज पालकमंत्री बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲड. जयस्वाल व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नागपूर जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र झिल्पा ता. मौदा प्रा.आ.केंद्र भारेगड, तालुका मौदा घाटपेंडरी तालुका पारशिवनी प्रा.आ.केंद्र तीष्टी तालुका सावनेर प्रा.आ.केंद्र पाचगांव ता सावनेर या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी या ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सॉफ्टवेअरचे लोकार्पण व क्रीडा साहित्य वाटप
जिल्हा नियोजन बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूरतर्फे शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या दोन सॉफ्टवेअरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या सॉफ्टवेअरमध्ये क्रिडांगण विकास योजना, व्यायामशाळा विकास योजना, युवक कल्याण योजना, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, नाविन्यपूर्ण योजना तसेच खनिकर्म विभाग अंतर्गत विविध योजनाच्या माहितीचा समावेश आहे. तसेच अँथलीट मॅनजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर द्वारे जिल्ह्यातील खेळाडूंची सर्वंकष माहिती संग्रहीत ठेवून त्यांच्या क्रीडा प्रवासाला आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याचबरोबर जिल्ह्यातील 121 जिल्हा परिषद शाळांना प्रत्येकी 3 लाख रुपये किमतीचे खनिकर्म विभाग अंतर्गत मंजूर निधीतून क्रीडा साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. प्रतिनिधीक स्वरूपात 10 शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
०००