आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचा आढावा
मुंबई, दि. 19 : गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले.
मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस राज्यातल्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या ते संपर्कात असून मुंबईतही त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात मंत्रिमंडळातील सर्व सहकारी राज्यातल्या विविध भागात जनजीवन सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत.
मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे सह पालकमंत्री श्री. लोढा यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली. तसेच व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांकडून मुंबईतील सद्य: स्थितीबाबत माहिती घेतली. मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी सखल भाग आहेत, त्याठिकाणी पाणी साचून वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्याठिकाणी तात्काळ पंप लावून पाण्याचा निचरा लवकरात लवकर करून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. तसेच कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या भागात काही वस्त्या टेकड्यांवर वसलेल्या आहेत. त्या ठिकाणी अधिक सतर्क राहून व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना यावेळी श्री. मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला केल्या. पालिकेची यंत्रणा कार्यरत असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून काळजी घ्यावी, असेही आवाहन लोढा यांनी मुंबईकरांना केले आहे.
00000