चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शासनाकडे सुपूर्द

सांस्कृतिक कार्य विभागाकडून सामंजस्य करारावर स्वाक्षरी

पुणे, दि.२०:  संवेदना, संवेदनशीलता आणि सहवेदना यांचे वेगवेगळे प्रकार असले तरी त्यामध्ये कलाकृती, चित्रकला यांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रयत्न असून दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे सुपूर्द करणे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या १३९ कलाकृती मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी शासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या, यावेळी ते बोलत होते.  शासनाच्यावतीने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि स्मीता परांजपे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

ॲड.शेलार म्हणाले, ज्याप्रमाणे ‘एआय’ महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे ‘सीआय’ म्हणजेच क्रिएटिव्हिटी महत्त्वाची आहे. त्यामुळे रवी परांजपे यांच्या कलाकृती शासनाकडे योग्य पद्धतीने जतन करून शासनाच्या अधिनस्त असलेल्या विविध संग्रहालयांमध्ये जनसामान्यांना पाहण्याकरिता राज्यभर प्रदर्शित करण्यात येतील. या कलाकृतींमधून योग्य संदेश राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. चित्रसाक्षरता हा विषय महत्त्वाचा असून इतका मौल्यवान ठेवा शासनाकडे सुपूर्द केल्याबद्दल मंत्री शेलार यांनी परांजपे कुटुंबियांना धन्यवाद दिले.

दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांनी साकारलेल्या ७२ मूळ पेंटिग्ज आणि ६७ फ्रेम आर्ट वर्क अशा एकूण १३९ चित्र कलाकृती महाराष्ट्र शासनास सुपूर्त करण्याची इच्छा दिवंगत रवी परांजपे यांच्या पत्नी स्मीता‍ परांजपे यांनी व्यक्त केली होती. या कलाकृती स्विकारण्यास व यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाच्या १७ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या कलाकृती  २६ जून २०२३ रोजी पुरातत्व संचालनालयाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. सध्या त्या सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत. नंतर या चित्र कलाकृतींमधील मोठा भाग मुंबई येथील नियोजित महाराष्ट्र राज्य वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

०००