- ३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आला असून, या कक्षामार्फत गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी पैशाची चणचण भासते. त्यामुळे बरेचदा रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक वेळेत उपचार घेऊ शकत नाहीत. अशावेळी कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचार न घेता परत जाता कामा नये. त्याच्यावर वेळेत उपचार व्हावेत आणि त्याचा जीव वाचावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कक्षाची स्थापना केली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना आणि पर्यायाने त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे. आजकाल दैनंदिन आयुष्यात अनेकदा आरोग्यपूर्ण जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अनेकदा एखाद्या कुटुंबावर अचानक गंभीर आजाराचा, अपघाताचा आघात होतो. रुग्णासह संपूर्ण कुटुंबाचा धीर खचून जातो. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज राहिली नसून प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाची स्थापना 1 मे 2025 पासून करण्यात आली आहे. रुग्णांना आता त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात उपचारासाठी मदतीसाठी अर्ज करता येणार असून, अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहितीसुद्धा त्यांच्या जिल्ह्याच्या कक्षात मिळणार आहे.
हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. येथे डॉ. नामदेव कोरडे हे कार्यरत असून, या कक्षामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत या निधीच्या माध्यमातून 30 रुग्णांना मदत केली आहे. यासाठी 23 लक्ष रुपयांचा निधी गेल्या 3 महिन्यात वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय हिंगोली कक्षाच्यावतीने दिली आहे.
शामराव किशनराव सूर्यवंशी हे हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा (ता.कळमनुरी) येथील रहिवाशी आहेत. ते व्यवसायाने शेतकरी असून, नेहमीप्रमाणे ते, त्यांचा भाऊ आणि मुलगा असे तिघेजण 23 जून 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शेतीकाम करून घराकडे परतत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला व पायाला मार लागला. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शामराव सूर्यवंशी यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील तुकामाई हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी ते एकसारखी बडबड करत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुढील तपासणी केली असता, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचे निदान झाले. पुढील उपचाराठी यशोसाई रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा मुलगा अविनाश याने हिंगोली येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे अर्ज दाखल केला.
त्यामुळे त्यांना 70 हजार रुपयांची मदत झाल्याचे सांगत त्यांचा मुलगा अविनाश सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि राज्य शासनाने आभार मानले आहेत. केवळ 2 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना नाकीनऊ येत असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळे माझ्या वडिलाचा जीव वाचला असल्याचा आनंद अविनाश सूर्यवंशी यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
सध्या वडील शामराव सूर्यवंशी यांच्यावर घरी औषधोपचार सुरु असून, लवकरच ते पूर्ववत आपले दैनंदिन जीवन जगण्याचा आनंद घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अविनाश याने महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मदत मिळाल्यामुळे त्यांच्या वडिलांचा जीव वाचला, याबाबत त्यांनी मनापासून आभार मानले. गरजू व पात्र लाभार्थ्यांना या मदतीमुळे खूप मोठा आधार मिळत असून ही मदत गरजू रुग्णांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरत आहे.
- संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली