मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या हेतूने कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिक, तसेच, दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे. जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तिंच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरिता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

विविध आपत्तीतील आपद्ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा प्रमुख उद्देश असला तरी, नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त खालील विविध बाबींकरिता निधीचा विनियोग करण्यात येत असतो.

नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी, पूर व भूकंप इत्यादी.) राज्यात तसेच देशात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांकरिता वेळोवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येते.

जातीय दंगल व बॉम्बस्फोट इत्यादी आपत्तीमध्ये शासनाच्या योजनेतून नियमानुसार देण्यात आलेल्या मदती व्यतिरीक्त अशा प्रकरणी मा. मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसहाय्याची अनुकुलता दर्शविली असेल तर, आपद्ग्रस्तांना मदत होण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.

अपघातामुळे कुटुंबातील कर्ता व्यक्ती मृत पावल्यास, ज्यांना कोणत्याही प्रकारे विमा संरक्षण नाही तसेच शासनाकडून किंवा शासनाच्या अन्य योजनामधून आर्थिक मदत मिळालेली नाही, अशा प्रकरणी अर्थसहाय्य दिले जाते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांच्या शिफारसीसह सविस्तर अहवाल व पोलीस पंचानामा (एफआय आर), शव विच्छेदन अहवाल व मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करुन घेऊन अर्थसहाय्याचे प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या आदेशार्थ सादर करण्यात येतात. मदत निधी योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. मदत थेट प्राप्तकर्त्याला प्रदान केली जाणार नाही.

याशिवाय, वित्तमालाचे नुकसान झाल्यास पंचनाम्यानुसार नुकसानीच्या प्रमाणात रक्कम रूपये तीन हजार ते वीस हजार या दरम्यान अर्थसहाय्य देण्यात येते. अशा प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांचा स्वयंस्पष्ट अहवाल, महसूल अधिकारी यांनी साक्षांकित केलेला नुकसानीचा पंचनामा आणि बाधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा तपशील आदि कागदपत्रांची पूर्तता संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून करून घेण्यात येते.

याचबरोबर रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या राज्यातील गरजू व गरीब रूग्णांवरील शस्त्रक्रिया/उपचारासाठी निधीतून अंशत: अर्थसहाय्य रुग्णालयाचे नावे प्रदान केले जाते. यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च एक लाखाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे), राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रेशन कार्ड / रहिवासी दाखला/ आधार कार्ड क्रमांक, तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. एक  लाखापेक्षा कमी असल्याबाबत), नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक, आमदार/खासदारांचे शिफारस पत्र, रुग्णालयास प्रदानाबाबत तपशील, यामध्ये बँक खाते क्रमांक, रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा, रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव, आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर, रुग्णालयाचा ई-मेल, सदर मदत ही प्रत्येक रुग्णास ३ वर्षातून एकदा देण्यात येईल. उपरोक्त गोष्टींची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे अंशत: अर्थसहाय्य करण्यात येते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगीही देता येते. सदर अर्थसहाय्य कलम 80 (जी) अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधिमध्ये जमा केलेली रक्कम ही आयकर सूट घेण्यास पात्र आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ख़ालीलप्रमाणे योगदान केले जाऊ शकते :

मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई, येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या नावे पोस्टल ऑर्डर/ मनी ऑर्डर द्वारे माध्यमातून, धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात, किंवा https://cmrf.maharashtra.gov.in  या पोर्टलवर ऑनलाईन भरणा करता येतो. किंवा धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या चलनमध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी एसबीआय संकलन शाखा जमा मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या नावे करावी. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटिजीएस किंवा एनईएफटी द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या चलन मध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री रिलीफ फंड एसबीआय संकलन शाखा जमा मुख्यमंत्री रिलीफ फंडच्या नावे करावी.

नाव आणि या संकलन बँकेच्या नोडल शाखा पत्ता   –

फंडाचे नाव          बँकेचे नाव     A/c क्रमांक          आयएफएससी कोड  

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (मुख्य खाते)    स्टेट बँक ऑफ इंडिया     खाते क्र. 10972433751     IFSC Code SBIN0000300

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असून, यामुळे हजारो गरजूंना नवसंजीवनी मिळत आहे. हा यशस्वी उपक्रम जनतेच्या हितासाठी सुरू आहे.

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

माहितीस्त्रोत – मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे संकेतस्थळ

00000