विकास करताना कोकणाचे समृद्ध वैभव जोपासणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
7

मुंबई, दि. 5 : कोकणाचा विकास करतानाच त्याचे समृद्ध वैभव जोपासण्याची ग्वाही देत एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी रोखण्याकरिता राज्याचा कायदा लवकरात लवकर करण्यात येईल. सिंधुरत्न योजना सुरु करतानाच चिपी विमानतळावरुन 1 मे रोजी विमान उड्डाण सुरु करण्यात येईल. जलदुर्गाची सफर घडविणारी योजना सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत कोकण विकासासंदर्भात सदस्य शेखर निकम यांनी नियम 293 अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. श्री.ठाकरे म्हणाले, कोकणचा कॅलिफोर्निया करणार असे नेहमी म्हटले जाते. मात्र, आपण कोकणाचा अशाप्रकारे विकास करुया की कॅलिफोर्नियाचा कोकण करणार असे कॅलिफोर्नियाने म्हटले पाहिजे. त्या धर्तीवर राज्य शासनाने कोकण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक मच्छिमार बांधवांचे प्रश्नदेखील सोडविले जाणार आहेत. नुकताच कोकणाच्या दौऱ्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बैठक घेऊन प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. सिंधुरत्न विकास योजना सुरु करणार असून त्यात मूलभूत, पायाभूत सुविधांचा समावेश केला जाणार आहे. या भागात एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी बंद करण्यासाठी कोस्ट गार्ड, पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असून यासंदर्भात मच्छिमारांचे हित जपण्यासाठी राज्य शासन कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मच्छिमारांचे डिझेल परताव्याचे पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. समुद्र महामार्गाचे काम जलद गतीने सुरु असून कोकणामध्ये जलमिशन योजना बंद केलेली नाही, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री म्हणाले, कोकणची सुंदर किनारपट्टी पर्यटनाच्या माध्यमातून दाखविण्यासाठी तसेच समुद्री जीवन पाणबुडीतून दाखविणारी योजना सर्वात आधी कोकणात सुरु करणार असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

राज्यातील जलदुर्गाची सफर घडविणारी योजना सुरु करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये कोकणात व्हायरोलॉजी लॅब सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास करताना कोकणाचे वैभव जपण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोकणाचे व्यक्तिमत्व जपतानाच तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

अजय जाधव/विसंअ/5.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here